वराडे गावच्या हद्दीतील श्रावणी हॉटेलजवळ घटना; एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात
उंब्रज :
कोल्हापूर–मुंबई मार्गावर एसटी बस थांबलेल्या अवस्थेत असताना चोरट्यांनी तब्बल ३५ हजार रुपये रोख रक्कम आणि अंदाजे ८० ते ९० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग लुटल्याची घटना बुधवारी (दि. ३० जुलै) पहाटे १२.४५ ते १.०० वाजण्याच्या सुमारास घडली. ही घटना वराडे (ता. कराड) गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल श्रावणी येथे घडली.
याप्रकरणी फिर्यादीने आरडाओरडा केल्यानंतर पोलिसांनी एकास घटनास्थळी पकडण्यात यश मिळवले असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत तीन ते चार चोरट्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
तळबीड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11302 क्रमांकाची कोल्हापूर–मुंबई शयनयान एसटी बस हॉटेल श्रावणी येथे बाथरूमसाठी थांबलेली असताना ही घटना घडली. प्रशांत कुंडलिक शिंदे (रा. कोराळे, ता. फलटण, सध्या रंकाळा स्टँड, कोल्हापूर) हे प्रवासी या बसमध्ये प्रवास करत होते. त्यांच्या ताब्यातील कृष्णा कुरिअर, कासार गल्ली, कोल्हापूर येथील सोन्याचे दागिने असलेली कुरिअर बॅग अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेली.
या बॅगेमध्ये ३५ हजार रुपये रोख रक्कम व सोन्याचे दागिने असलेले २० लहान डबे होते. चोरट्यांनी प्रशांत शिंदे यांना मारहाण करत ही बॅग चोरून नेल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेनंतर तळबीड पोलीस ठाण्याच्या पथकांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून शोध मोहीम सुरू केली आहे. सध्या राहुल दिनकर शिंगाडे (वय २८, रा. शिंगणापूर, ता. माण, जि. सातारा) या संशयितास ताब्यात घेण्यात आले असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले करत आहेत.








