महिलेच्या मृत्यूनंतर चेन्नई प्रशासनाने भरून काढले खड्डे
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. एक 22 वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनियरला चेन्नईच्या मदुरवोयलनजीक एका ट्रकने चिरडले आहे, या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. कथितपणे रस्त्यावरील एका खड्डय़ात महिलेने स्वतःच्या दुचाकीवरील नियंत्रण गमाविले होते, यानंतर मागून आलेल्या भरधाव ट्रकने महिलेच्या दुचाकीला धडक दिली होती. दुर्घटनेवेळी युवतीसोबत तिचा छोटा भाऊही सोबत होता. या दुर्घटनेत तो जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चेन्नईत ही दुर्घटना मंगळवारी घडली आहे. युवती स्वतःच्या भावाला शाळेत सोडण्यासाठी जात होती. मृत युवतीचे नाव एस. शोभना असून ती पोरूर येथे राहत होती. झोहो कंपनीचे सीईओ श्रीधर वेम्बू यांनी या दुर्घटनेसाठी चेन्नईतील ‘खराब रस्त्यां’ना जबाबदार ठरविले आहे.
दुर्घटनेनंतर पोलिसांनी शोभनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. तर शोभना आणि तिच्या भावाने हेल्मेट घातलेले नव्हते असे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी संबंधित ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. दुर्घटनेनंतर प्रशासनाने खराब रस्त्यावरील खड्डे भरून काढले आहेत.
महिला सॉफ्टवेअर इंजिनियरच्या मृत्यूनंतर जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. या दुर्घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. हा संताप दूर करण्यासाठी प्रशासनाने रस्त्यांवरील खड्डे भरून काढण्याचे काम हाती घेतले आहे.









