वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सैबेरियाच्या सदैव हिमाच्छादीत राहणाऱ्या प्रदेशात 46 हजार वर्षांपूर्वी गोठलेल्या एका जिवाणूला पुन्हा जिवंत करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. अशा प्रकारचे हे प्रथमच यश असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत हा जिवाणू कोणालाही ज्ञात नव्हता. त्यामुळे त्याच्यावर प्रयोग करताना अतिशय दक्षता घेण्यात आली होती. 46 हजार वर्षांपूर्वी या ‘राऊंडवर्म’ प्रकारच्या जिवाणूचा शोध नुकताच लागला आहे. संशोधक नेहमीप्रमाणे सैबेरियात संशोधन करीत असताना त्यांना हिमखंडात गोठलेल्या अवस्थेत हा जिवाणू आढळला. त्यानंतर अलगदपणे हिमाचा तुकडा कापून त्याला बाहेर काढण्यात आले. नंतर त्याच्यावर विशिष्ट रासायनिक आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रक्रिया करत त्याला पुन्हा जागत्या स्थितीत आणण्यात आले. हे कार्य अत्यंत अवघड आणि जिकीरीचे होते. मात्र, ते कौशल्याने करण्यात आले. आता या जिवाणूचे पुनरुत्पादन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या जिवाणूवरुन त्याकाळातील सूक्ष्मजीवांच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच सांप्रतच्या काळात जिवाणूंविरोधातील औषधे निर्माण करण्यासाठी या जिवाणूच्या अभ्यासाचाही उपयोग होणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.