27 पिढय़ांपासून चालत आलाय व्यवसाय
शरीराच्या विविध हिस्स्यांवर लोक डिझाइनपासून नाव कोरून घेत आहेत. अनेक ठिकाणी आता टॅटू आर्टिस्ट दिसून येतील. परंतु टॅटूचे सर्वात जुने दुकान कुठले असा विचार कधी केला आहात का? जगातील टॅटूचे सर्वात जुने दुकान भारतात नव्हे तर जेरूसलेम येथे आहे.
रज्जूक टॅटू हे 720 वर्षे जुने टॅटूचे दुकान आहे. याचे पूर्ण नाव रज्जूक टॅटू, टॅटू विथ हेरिटेज सिन्स 1300’ असे आहे. हे दुकान 1300 साली सुरू करण्यात आले होते. त्या काळात हाथांवर डिझाइन तयार करण्यासाठी लाकडी तुकडय़ांचा वापर केला जात होता. आता या टॅटूचे दुकान वसीम रज्जूक हे चालवत असून ते 27 व्या पिढीचे प्रतिनिधित्व करत आहेत.

रज्जूक कुटुंब हे कॉप्टिक ख्रिश्चन होते. हा इजिप्तमधील एक धार्मिक समुदाय होता, ज्यात टॅटू काढून घेण्याची प्रथा फार जुनी होती. त्या काळात कॉप्टिक ख्रिश्चनांमध्ये कॉप्टिक क्रॉस काढून घेतला जात होता. या क्रॉसद्वारे ते स्वतःच्या धार्मिक मान्यता प्रदर्शित करायचे. 640 साली इस्लाम धर्माचा वेगाने प्रसार होत असताना ख्रिश्चनधर्मीय क्रॉस तयार करवू घेत स्वतःच्या धर्माबद्दलचा ओढा दर्शवून देत होते. अनेक ठिकाणी तर शरीरावरील क्रॉस पाहूनच चर्चमध्ये प्रवेश दिला जात होता. रज्जूक कुटुंब इजिप्तमधून जेरूसलेम येथे पोहोचल्यावर त्यांनी स्वतःसोबत ही प्रथा देखील नेली.
गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंद
1300 साली रज्जूक टॅटूचे दुकान स्थापन झाले. टॅटूची ही कला माझ्या वडिलांनी शिकविली, त्यांना त्यांच्या वडिलांनी शिकविली होती असे वसीम यांनी सांगितले. वसीम यांचे आजोबा हे इस्रायलमये इलेक्ट्रिक टॅटू मशीनचा वापर करणारे पहिले टॅटू आर्टिस्ट होते. ते कारच्या बॅटरीद्वारे मशीन वापरत होते. याचबरोबर त्यांनी पहिल्यांदा टॅटूमध्ये रंगाचा वापर केला होता. वसीम यांनी 2007 मध्ये ही कला आत्मसात केली होती. आता या दुकानाचे नाव 2022 मध्ये गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाले आहे.









