समोर आली चकित करणारी छायाचित्रे
सोशल मीडियावर एका विशाल आकाराच्या खड्डय़ाची छायाचित्रे व्हायरल होत आहेत. चिलीमध्ये शनिवारी अचानक हा विशाल आकाराचा खड्डा तयार झाल्याने खळबळ उडाली आहे. हा खड्डा 650 फूट खोल असून त्याची रुंदी 82 फूट इतकी आहे. या खड्डय़ाचा तांब्याच्या खाणीशी संबंध असल्याचे सांगण्यात येत ओ. चिलीची राजधानी सँटियागोपासून सुमारे 650 किलोमीटर अंतरावरील ठिकाणी हा खड्डा तयार झाला आहे. चिलीच्या अधिकाऱयांनी याप्रकरणी सोमवारपासून शास्त्राrय तपासणी सुरू केली आहे.
हा विशाल आकाराचा खड्डा चिलीच्या टिएरा अमरिला शहरात (कोपियापो प्रांत) अचानक तयार झाला आहे. लंदिन मायनिंग नावाच्या कॅनडाच्या कंपनीच्या नियंत्रणाखाली हा भाग येतो. या खड्डय़ानजीकच विशाल ‘अलकपरोस खाण’ आहे. या खड्डय़ामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. लंदिन मायनिंगकडे 80 टक्के जमिनीची मालकी आहे. तर जपानच्या सुमितोमो कॉर्पोरेशनकडे उर्वरित जमिनीची मालकी आहे.

मोठय़ा प्रमाणात पाणी
नॅशनल सर्व्हिस ऑफ जियोलॉजी अँड मायनिंगचे संचालक डेव्हिड मोंटेनीग्रो यांनी तज्ञांना या भागात पाठविले असल्याचे सांगितले. खड्डय़ामध्ये कुठल्याही प्रकारची सामग्री मिळालेली नसली तरी मोठय़ा प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. हा खड्डा कशामुळे तयार झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही असे त्यांनी म्हटले आहे. लोक या खड्डय़ाला खाणकामाशी जोडून पाहत आहेत. या खड्डय़ाचा आकार अद्याप वाढतोय असे स्थानिक अधिकाऱयांचे सांगणे आहे.









