ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका 5 वर्षांच्या मुलीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आली आहेत. या मुलीच्या त्वेचेला खाज येत असून, पुरळ उठले आहेत. तसेच तिच्या शरीरावर व्रणही आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या मुलीचे काही नमुने तात्काळ पुण्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे पाठविण्यात आले आहेत. सीएमओ गाझियाबाद यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
मंकीपॉक्ससदृश्य लक्षणे आढळलेल्या या मुलीची किंवा तिच्या कुटुंबियांची कोणतीही विदेश प्रवासाची हिस्टरी नाही. खाज, पुरळ आणि शरीरावर व्रण आढळल्याने मुलीला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तिला इतर कोणताही त्रास जाणवत नाही. मात्र, खबरदारी म्हणून या मुलीचे काही नमने पुणे येथील लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल पुढील 24 तासात येणार आहे. या मुलीमध्ये आढलेली मंकीपॉक्ससदृश्य लक्षणे इतर आजाराचीही असू शकतात, असेही सीएमओंनी सांगितले.
दरम्यान, उत्तरप्रदेशच्या आरोग्य विभागाने राज्यातील सर्व जिह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच ताप आणि शरीरावर पुरळ येत असल्यास संबंधित रुग्णाची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी कार्यालयाला द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.