मंदिर अन् सूर्येदयाशी आहे कनेक्शन
दक्षिण अमेरिकेतील देश पेरूमध्ये पुन्हा एकदा पुरातत्व तज्ञांनी 3 हजार वर्षे जुया ममीचा शोध लावला आहे. यापूर्वी सुमारे दीड वर्षाआधी पुरातत्व तज्ञांनी पेरूच्या मध्य तटावर सुमारे 800 वर्षे जुन्या ममीचा शोध लावला होता. या ममीतील पार्थिवाचे हातपाय बांधून ठेवण्यात आले होते. तर पुरातत्व तज्ञांनी आता एंडेअन राष्ट्रात लावलेला नवा शोध हा पूर्व हिस्पॅनिश काळातील असल्याचे सांगण्यात आले. पेरूची राजधानी लीमा येथे मिळालेल्या या ममीचा मंचे संस्कृतीशी संबंध असल्याचे बोलले जात आहे.

सॅन मार्को युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी आणि संशोधकांनी उत्खननाच्या प्रारंभीच एका ममीचे केस अन् कवटीचे काही अवशेष शोधले. त्यानंतर खोदकामादरम्यान ही ममी आढळून आली. ही ममी लीमा येथील खोऱ्यात 1500 ते 1000 ख्रिस्तपूर्व या काळातील असावी असे मत पुरातत्व तज्ञ मिगुएल एगुइलर यांनी व्यक्त केले आहे. ही ममी यू-आकारातील मंदिरांच्या निर्मितीशी संबधित असून ती सूर्योदयाच्या दिशेने इशारा करत असल्याचे एगुइलर यांनी सांगितले आहे.
या मंदिराच्या निर्मितीच्या अंतिम टप्प्यादरम्यान या इसमाचा बळी देण्यात आला असावा. ही ममी सुमारे 3 हजार वर्षे जुनी आहे. या शोधादरम्यान पुरातत्व तज्ञांनी शरीरासोबत गाडले गेलेल्या अन्य वस्तूंचाही शोध लावला आहे.यापूर्वी देखील पुरातत्व तज्ञांनी पेरूमध्ये सुमारे 800 वर्षे जुन्या ममीचा शोध लावला होता. संबंधित मृतदेहाला एका विशेष प्रकारच्या कापडात गुंडाळून ठेवण्यात आले होते. एंडियन पर्वतीय भागात या ममीचा शोध लागला होता.









