3.3 कोटी रुपयांचा पहिल्या तिमाहीत नफा: महसुलात झाली वाढ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
फॅशन क्षेत्रातील ई कॉमर्स कंपनी नायकाने पहिल्या तिमाहीत नफ्यात 27 टक्के इतकी घसरण नोंदवली असल्याची माहिती आहे. असं जरी असलं तरी महसुलात मात्र सदरच्या तिमाहीत वाढ नोंदवली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीतील निकाल घोषित केला आहे. कंपनीने या अवधीत 3.3 कोटी रुपये इतका एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी समान अवधीत कंपनीने 4.5 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. दुसरीकडे 24 टक्के वाढीसह वर्षाच्या आधारावर 1422 कोटी रुपयांचा महसूल पहिल्या तिमाहीत कंपनीने प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच अवधीत महसूल 1148 कोटी रुपये इतका होता.
रिटेल क्षेत्रात वृद्धी
कंपनीने जूनअखेरपर्यंत देशात 152 स्टोअर्ससह रिटेल स्पेसमध्ये वर्षाच्या आधारावर 43 टक्के इतकी वृद्धी नोंदवली आहे. कंपनीचा पहिल्या तिमाहीतील एकूण खर्च 1418 कोटी रुपयांवर पोहचला आहे, जो मागच्या वर्षी 1148 कोटी रुपये इतका होता. म्हणजेच या खेपेला खर्चात वाढ झाली आहे. कंपनीच्या सौंदर्य आणि वैयक्तिक काळजीच्या उत्पादनांच्या विक्रीने 24 टक्के वाढीव कामगिरी नोंदवली आहे.









