ऑस्ट्रेलियात कायदेशीर अनुमती
दीर्घायुष्य लाभावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु ऑस्ट्रेलियात केवळ 23 वर्षे वय असणारी लिली ही बहुधा इच्छामरणाची निवड करणारी जगातील सर्वात कमी वयाची महिला ठरणार आहे. लिलीने इच्छामरणाचा पर्याय निवडला असून ऑस्ट्रेलियन कायद्यानुसार तिला याची अनुमतीही मिळाली आहे. या निर्णयामागे असह्य वेदनांची पार्श्वभूमी आहे.
लिली ही ऑटो इम्यून ऑटोनोमिक गॅन्ग्लिओनोपॅथी नावाच्या एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे. बोलल्यावरही तिचे शरीर कापू लागते. या आजारात मानवी शरीरच स्वत:वर आक्रमण करू लागते. यामुळे संबंधित रुग्ण अपंग होतो. सातत्याने असह्या वेदना होऊ लागतात. लिलीच्या इच्छामरणासाठी सर्वप्रकारची कागदपत्रे तयार करण्यात आली असून बुधवारी ती चिरशांती घेणार आहे. समुद्रकिनाऱ्यावर नेण्यात यावे अशी तिची अंतिम इच्छा होती, जी हेल्थकेअर कर्मचाऱ्यांनी पूर्ण केली. समुद्रकिनाऱ्यावर आराम करतानाचे तिचे छायाचित्र व्हायरल झाले आहे.

वयाच्या 17 व्या वर्षापासून लिली वेदनांना सामोरी जात आहे. एका डॉक्टरने एहलर्स डॅनलोस सिंड्रोम असल्याचे निदान केले होते, त्यानंतर एक वर्षानी तिला श्वसनावेळी त्रास जाणवू लागला, मग चालणे-फिरणे तसेच अन्न ग्रहण करणेही तिला अशक्य ठरले. कण्याच्या हाडातून एका रसायनाची गळती होऊ लागली. याकरता औषध देण्यात आले होते, परंतु त्याचा कुठलाच लाभ झाला नाही. तिची प्रकृती अत्यंत बिघडल्याने तिला हेलो ब्रेस परिधान करावा लागतो, तसच नेजल फीडिंग ट्यूबचा वापर करावा लागतो, कारण ती स्वत: काहीही खाऊ शकत नाही. तिच्यावर स्पायनल फ्यूजन शस्त्रक्रिया झाली असून पोटातील अॅसिड स्त्रावात मदत करण्यासाठी एक ट्यूब लावण्यात आली आहे. हे सर्व अत्यंत वेदनादायी असल्याने तिची जगण्याची इच्छाच संपून गेली आहे.
मागील वर्षी जानेवारीत ऑस्ट्रेलियात इच्छामरणाचा कायदा संमत झाल्यावर तिला स्वत:चे जीवन संपविण्याचा आणि वेदनेपासून मुक्ती मिळविण्याचा मार्ग दिसून आला. लिलीने अर्ज केला आणि सर्वकाही तपासून झाल्यावर तिला कायदेशीर अनुमती मिळाली आहे. 23 वर्षीय लिली बुधवारी अखेरचा श्वास घेणार आहे. कायदेशीर स्वरुपात स्वत:चे जीवन संपविण्याप्रकरणी लिली ही सर्वात कमी वयाची व्यक्ती ठरणार आहे. लिलीवर अॅडलेडच्या फ्लिंडर्स मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू होते.









