आत्महत्या की बुडून मृत्यू याची पोलिसांकडून चौकशी
सांगे : सांगेतील वाडे कुर्डी ग्रामपंचायत क्षेत्रातील कुर्पे येथे पाण्याने भरलेल्या खनिज खंदकात सर्वेश तुळशीदास वाडेकर या 21 वर्षीय युवकाला मृत्यू येण्याची घटना घडली आहे. ही मात्र ही आत्महत्या आहे की, बुडून मृत्यूचे प्रकरण आहे याची चौकशी पोलीस करत आहेत. मंगळवारी सायंकाळी 7 वा. ही घटना घडली. 7.20 वा. अग्निशमन दलाला माहिती मिळाली. त्यानंतर शोधकार्य सुरू झाले ते रात्री साडेदहापर्यंत चालू होते. बुधवारी सकाळी 8.30 ला शोधकार्य पुन्हा चालू केले असता अग्निशामक दलाचे जवान आणि पोलिसांना अथक मेहनत घेऊन सर्वेशचा मृतदेह सकाळी 10 च्या दरम्यान खंदकातून वर काढण्यात यश आले. सर्वेश हा मंगळवारी सकाळी डॉक्टरकडे जाऊन आला होता. त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. खंदकाच्या शेजारी सर्वेशचे चप्पल आणि मोबाईल आढळून आला होता. त्यामुळे ही आत्महत्या की बुडून मृत्यूचे प्रकरण आहे याची चौकशी पोलीस करत आहेत. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवून दिला आहे.









