400 नागरिकांसह स्थापन केला देश
एक दिवस स्वत:चा देश स्थापन करण्याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? हे विचित्र वाटत असले तरीही एका 20 वर्षीय युवकाने हे खरे करून दाखविले आहे. त्याने क्रोएशिया आणि सर्बियादरम्यान भूमीच्या एका वादग्रस्त तुकड्यावर स्वत:ला एका स्वयंघोषित देशाचा अध्यक्ष घोषितकेले आहे. याचबरोबर या देशाचा ध्वज, एक पूर्ण मंत्रिमंडळ, चलन आणि सुमारे 400 नागरिक देखील आहेत.
ब्रिटनचा रहिवासी असलेल्या या युवकाचे नाव डॅनियल जॅक्सन असून त्याने फ्री रिपब्लिक ऑफ वेर्डिसची स्थापना केली. हा मायक्रोनेशन डेन्यूब नदीच्या काठावर जंगलाच्या 125 एकरापेक्षाही कमी भूभागाचा छोटासा हिस्सा आहे. क्रोएशिया आणि सर्बिया यांच्यातील सीमावादामुळे या भूभागावर कुणाचाच दावा नव्हता. या भूभागाला ‘पॉकेट थ्री’ नावाने ओळखले जाते. डॅनियलने स्वत:च्या देशाची अधिकृत वेबसाइटही तयार केली आहे.
मायक्रोनेशन वेर्डिसचा विचार मला वयाच्या 14 व्या वर्षी आला होता. हा केवळ काही मित्रांसोबत एक छोटासा प्रयोग होता, असे डॅनियल सांगतो. डॅनियलने 30 मे 2019 रोजी मायक्रोनेशनची घोषणा केली होती. जॅक्सन एक डिजिटल डिझायनर असून तो रोबोक्सवर व्हर्च्युअल जग तयार करत स्वत:ची कमाई करतो. जॅक्सनने वेर्डिस येथे मंत्रिमंडळही स्थापन केले आहे. वेर्डिसची अधिकृत भाषा इंग्रजी, क्रोएशियन आणि सर्बियन आहे. तर तेथे यूरोला चलन म्हणून वापरले जाते. वेर्डिसपर्यंत केवळ क्रोएशियन शहर ओसियेक येथून नौकेद्वारे पोहोचता येते. ऑक्टोबर 2023 मध्ये क्रोएशियन पोलिसांनी जॅक्सनसमवेत अनेक लोकांना ताब्यात घेत निर्वासित केले होते आणि त्यांच्यावर देशात प्रवेशाकरता आजीवन बंदी घातली होती. वेर्डिसची सुरुवात केवळ 4 लोकांसोबत झाली होती, परंतु आता मायक्रोनेशचे एकूण 400 अधिकृत नागरिक आहेत. तर हजारो लोकांनी तेथे स्थायिक होण्यास रुची दाखविली आहे.









