मानवी कवटीद्वारे झाली होती निर्मिती
सर्वसाधारणपणे प्राचीन कंगवे हे लाकडी किंवा धातूचे असतात, परंतु आता पुरातत्वतज्ञांना एक असा कंगवा मिळाला आहे, ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्ही चकित व्हाल. हा कंगवा मानवी कवटीद्वारे तयार करण्यात आला होता. हा प्राचीन कंगवा 2 हजार वर्षे जुना आहे. इंग्लंडच्या कॅम्ब्रिजशायरमधील बार हिल गावात या कंगव्याचा शोध लागला आहे.
बाल हिल गावात तीन वर्षांपासून उत्खनन सुरू होते, जे 2018मध्ये संपुष्टात आले. या उत्खननात अनेक पुरातन वस्तू मिळाल्या आहेत, या वस्तू ख्रिस्तपूर्व 750 काळातील आहेत. म्हणजेच लोहयुगातील हा कंगवा 2 इंच लांबीचा आहे. हा कंगवा म्युझियम ऑफ लंडन आर्कियोलॉजीमध्ये ठेवण्यात आला आहे. पुरातत्व तज्ञांनी याला बार हिल कॉम्ब नाव दिले आहे.

बार हिल गावात झालेल्या उत्खननात सुमारे 2.80 लाख प्राचीन वस्तू मिळाल्या आहेत. या वस्तूंसंबंधी अधिक अध्ययन केले जात आहे, सध्या कंगव्यावरून पुरातत्व तज्ञांना कुठलाच ठोस निष्कर्ष काढता आलेला नाही. हा कंगव्याचा केस विंचरण्यासाठी वापर व्हायचा का तो ताईतप्रमाणे परिधान केला जायचा हे स्पष्ट नाही, कारण या कंगव्याच्या मध्ये एक गोल छिद्र देखील आहे.
लोहयुगात लोक कशपाकारे मानवी शरीराच्या अवशेषांचा वापर करायचे हे या कंगव्यामुळे समजणार आहे. बार हिल कॉम्बचे लोहयुगात त्याचे महत्त्वपूर्ण स्थान होते असे प्रथमदर्शनी जाणवते. स्थानिक समुदायांदरम्यान ही महत्त्वाची वस्तू मानली जात असावी असे उद्गार प्राचीन वस्तूंचे जाणकार माइकल मार्शल यांनी काढले आहेत. या कंगव्यांमुळे लोक स्वतःच्या दिवंगत लोकांचे स्मरण करत असतील. किंवा वाईट आत्म्यांपासून वाचण्यासाठी ताईतप्रमाणे गळय़ात परिधान करत असावेत असे माइकल यांनी म्हटले आहे. कॅम्ब्रिजशायरमध्ये अशाचप्रकारच्या दोन वस्तू मिळाल्या होत्या. 1970 आणि 2000 साली सापडलेल्या या दोन्ही वस्तू कंगव्यासारख्या दिसत होत्या. लोहयुगाच्या परंपरा समजून घेणे सोपे नसल्याचे मायकल यांचे म्हणणे आहे.









