सामूहिक बलात्काराची शक्यता : मृतदेहाचे अवशेष हस्तगत
वृत्तसंस्था /भीलवाडा
राजस्थानच्या भीलवाडामध्ये 14 वर्षीय मुलीला कोळसा भट्टीत जाळण्यात आले आहे. जाळण्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला असण्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. भीलवाडा जिल्ह्यातील एका गावात बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. याप्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी सकाळी 8 वाजता अल्पवयीन मुलगी घरातून बाहेर पडली होती. संध्याकाळी उशिरापर्यंत मुलगी परतली नव्हती. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. गावातील सर्व नातेवाईकांच्या घरी अन् शेतात शोध घेतला, परंतु तिचा थांगपत्ता लागला नव्हता. रात्री सुमारे 10 वाजता कुटुंबीय अन् ग्रामस्थांना एक कोळसा भट्टी पेटत असल्याचे दिसून आले. संशय बळावल्याने भट्टीनजीक जाऊन पाहिल्यावर बेपत्ता मुलीचे चप्पल तेथे दिसून आले. तसेच तिच्या हातातील चांदीचे कंकण अन् हाडांचे अवशेषही मिळाले. ग्रामस्थांनी रात्रीच याप्रकरणी काही आरोपींना पकडले होते. या आरोपींनी सामूहिक बलात्कार अन् मुलीला जाळल्याची कबुली दिल्यावर पोलिसांना यासंबंधी कळविण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून रात्रीच फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. गुरुवारी पुन्हा एकदा सर्व अधिकारी अन् तपासपथकांनी घटनास्थळी जात चौकशी केली आहे. मुलीची हत्या करून तिला जाळण्यात आले आहे. तपासादरम्यान चार जणांवर संशय बळावल्याने त्यातील तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. बलात्काराची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही, यासंबंधी तपास केला जात असल्याचे पोलीस अधीक्षक आदर्श सिद्धू यांनी सांगितले आहे.









