90 चे केले 99 टक्के, फॉन्टमुळे झाले उघड
संदीप कांबळे/पणजी
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी 7 एप्रिल रोजी जाहीर झाला असून, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांच्या परीश्रमाने यंदा दहावीचा निकाल उत्तमरित्या आणि लवकर जाहीर झाला. शिक्षण मंडळाकडून पारदर्शी काम झालेले असतानाच या सर्वावर गालबोट लावण्याच्या प्रकार दहावीतील एका विद्यार्थ्याकडून घडला आहे. दहावी पास झालेल्या या विद्यार्थ्याने बनावट गुणपत्रिका तयार केल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्यो यांच्या कानावर येताच त्यांनी अशा प्रकाराला खपवून घेऊ नये, असे निर्देश राज्यातील शाळांना दिले आहेत. बनावट मार्कलिस्ट बनविणाऱ्या या विद्यार्थ्याची संबंधित शाळेमार्फत कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकारात तथ्य आढळल्यास संबंधित शाळेला या विद्यार्थ्याविरोधात सायबर पोलिसांत तक्रार देण्याचीही सूचना शेटये यांनी दिलेली आहे.
90 चे केले 99 टक्के
राज्यातील प्रसिद्ध शाळेतील या विद्यार्थ्याला 90 टक्क्यांहून अधिक गुण दहावी परीक्षेत मिळाले. तरीही या विद्यार्थ्याने गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गुणपत्रिकेप्रमाणेच बनावट मार्क लिस्ट कॉम्प्युटरच्या सहाय्याने तयार केले. त्या बनावट गुणपत्रिकेत त्याने स्वत:ला 99 टक्के गुण मिळाल्याचे दाखवले.
फॉन्टमुळे उघडकीस आला प्रकार
हा प्रकार शाळा व्यवस्थापन व संबंधित मुख्याध्यापकांच्या लक्षात येताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता. शिक्षण मंडळाच्या निकालामधील गुणांसाठी वापरण्यात आलेला फॉन्ट आणि बनावट गुणपत्रिकेतील फॉन्ट हा वेगवेगळा असल्याचे लक्षात येताच हा बनावट मार्कलिस्टचा प्रकार लक्षात आला. गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची कार्यपद्धती ही अगदी पारदर्शी अशी आहे. त्यामुळेच गोवा बोर्डाच्या वेबसाईटप्रमाणेच केंद्र सरकारच्या डीजी लॉकर या ठिकाणीही बोर्ड परीक्षेचा निकाल उपलब्ध आहे. देशातील अवघ्याच राज्यांतील शिक्षण क्षेत्राचे डीजी लॉकर या वेबसाईटवर निकाल नोंद होतात. त्यामध्ये गोवा हे एक राज्य आहे. राज्यातील शिक्षण मंडळाकडून नेहमीच पारदर्शीपणा राखण्याचा प्रयत्न केला आहे, तरीही काही विद्यार्थ्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे असे प्रकार घडत असल्याने चिंतेचा विषय बनला आहे.
दोन वर्षांनंतर पुन्हा प्रकार
बनावट मार्क लिस्ट तयार करण्याचा प्रकार दोन वर्षांपूर्वी घडला होता. आता यंदा झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालाबाबतही असाच प्रकार घडला आहे. ज्या विद्यार्थ्याने हा प्रकार केला आहे.
असे प्रकार खपवून घेणार नाही : शेट्यो
बनावट मार्क लिस्ट तयार करण्याचा प्रकार हा गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून, असे प्रकार गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कदापिही खपवून घेणार नाही. शिक्षण मंडळाची वेबसाईटप्रमाणेच केंद्र सरकारच्या डीजी लॉकर या वेबसाईटवरही दहावीचा निकाल त्याचक्षणी अपलोड झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी केवळ गोवा बोर्डाची बेवसाईट आणि केंद्र सरकारच्या डीजी लॉकर या वेबसाईटवरूनच निकाल डाऊनलोड करायला हवेत, अशी सूचनाही भागीरथ शेट्यो यांनी बनावट मार्कलिस्ट प्रकरण उजेडात आल्यानंतर पालकांना व विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.








