वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतामध्ये 100 टक्के इथेनॉल इंधन असलेले वाहन ऑगस्टमध्ये भारतात लॉन्च करण्यात येणार आहे असे परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. हा देशातील एक क्रांतिकारी उपक्रम आहे, जो आयात-पर्याय, किफायतशीर, प्रदूषणमुक्त आणि पूर्णपणे स्वदेशी राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या भारतीय बाजारपेठेत इथेनॉलची किंमत 66 रुपये प्रति लीटर आहे आणि पेट्रोलची किंमत 108 रुपये आहे. असे झाल्यास लवकरच दुचाकी आणि कार भारतीय रस्त्यावर स्वस्त इंधनावर धावताना दिसणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्री म्हणाले, ‘ऑगस्टपासून मी 100 टक्के इथेनॉलवर चालणारे वाहन बाजारात आणणार आहे. बजाज, टीव्हीएस आणि हिरो यांनी 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारसायकल बनवल्या आहेत.’ असेही त्यांनी सांगितले आहे.
टोयोटा कंपनीची 60 टक्के पेट्रोल आणि 40 टक्के इलेक्ट्रिकवर चालणारी केमरी कार आता देशात लॉन्च करण्यात येणार असून जी 60 टक्के इथेनॉल आणि 40 टक्के इलेक्ट्रिकवर चालेल.
काय आहे इथेनॉल?
इथेनॉल एक प्रकारचे अल्कोहोल आहे, जे स्टार्च आणि साखर यातून तयार केले जाते. हे पेट्रोलमध्ये मिसळले जाते आणि वाहनांमध्ये पर्यावरणास अनुकूल इंधन म्हणून वापरले जाते. इथेनॉल हे प्रामुख्याने उसाच्या रसापासून तयार केले जाते, परंतु मका, कुजलेले बटाटे आणि कुजलेल्या भाज्या यासारख्या स्टार्चयुक्त पदार्थांपासूनही इथेनॉल तयार केले जाऊ शकते अशी माहिती त्यांनी यावेळी दिली
एप्रिलपासून देशात ई-20 ची विक्री
पेट्रोल-डिझेल वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि इंधनाच्या किमती कमी करण्यासाठी जगभरातील सरकारे इथेनॉल मिश्रित इंधनावर काम करत आहेत. भारतात पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉलकडेही पाहिले जात आहे. त्यामुळे वाहनांचे मायलेजही वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले आहे.
सर्वसामान्यांना काय फायदा :
इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर चालणारी कार पेट्रोलच्या तुलनेत खूपच कमी गरम राहते. इथेनॉलमध्ये अल्कोहोल लवकर बाष्पीभवन होते, त्यामुळे इंजिन लवकर गरम होत नाही. याशिवाय ते कच्च्या तेलापेक्षा खूपच स्वस्त असेल. त्यामुळे महागाईतूनही दिलासा मिळणे अपेक्षित आहे.
? 1जी इथेनॉल : उसाचा रस, गोड बीटरूट, कुजलेला बटाटा, गोड ज्वारी आणि मका यापासून इथेनॉल तयार केले जाते.
? 2जी इथेनॉल: अन्य एका प्रकारात इथेनॉल सेल्युलोज आणि लिग्नोसेल्युलोसिक पदार्थांपासून तयार केले जाते जसे की- तांदूळ, गव्हाची भुसी, कॉर्न , बांबू आणि वृक्षाच्छादित बायोमास.
? 3 जी जैवइंधन: तिसऱ्या प्रकारात जैवइंधन शैवालपासून बनवले जाईल. त्यावर सध्या काम सुरू आहे.
शेतकऱ्यांना फायदा :
इथेनॉलचा वापर वाढल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल. इथेनॉल ऊस, मका आणि इतर अनेक पिकांपासून बनवले जाते. साखर कारखानदारांना उत्पन्नाचे नवे स्त्राsत मिळणार असून उत्पन्नात वाढ होणार आहे. इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना 21 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला असल्याची माहिती आहे.









