डिझेलनेही पार केली नव्वदी, इंधनाचे दर गगनाला भिडल्याने नागरिकांत नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र व राज्य सरकारने इंधनाच्या करामध्ये केलेली वाढ व आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या वाढलेल्या दरामुळे शुक्रवारी बेळगावमध्ये पेट्रोल 100 रुपये 4 पैसे तर डिझेल 92 रुपये 88 पैसे प्रतिलिटर झाले. इतिहासामध्ये प्रथमच पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आधीच कोरोनामुळे हाताला काम नाही, त्यातच इंधन दरवाढीने महागाईचा दणका बसला आहे.
एप्रिल महिन्यात देशात काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका व लोकसभेसाठी पोटनिवडणुका पार पडल्या. आचारसंहिता संपताच देशभरात इंधन दरवाढीला सुरुवात झाली. दररोज काही पैशांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत होती. हळूहळू दर वाढ होत पेट्रोल दर शंभर रुपयांच्या पुढे गेला आहे. एक लिटर पेट्रोलसाठी आता 100 रुपयांची नोट द्यावी लागणार आहे.
वाहतूक खर्चात वाढ होण्याची शक्यता
पेट्रोलसोबतच डिझेलचा दर 90 रुपयांच्या पुढे गेला आहे. अवजड वाहने डिझेलवर अवलंबून असल्याने वाहतूक खर्चात वाढ होणार आहे. कोरोनामुळे व्यवसाय ठप्प असतानाच आता इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढणार आहे. डिझेलचे दर वाढल्याने प्रवासी वाहतुकीचा दरही वाढण्याची शक्मयता आहे. वाहतुकीचा दर वाढल्याने अन्नधान्य व इतर वस्तूंच्या दरावरही परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
दररोज काही पैशांनी वाढ
शुक्रवारी बेळगावमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेला तर डिझेलचाही दर 92 रुपयांवर गेला आहे. इंधनाचे दर वाढल्याने ग्राहक पेट्रोल, डिझेल भरण्यापूर्वी इंधन दरवाढीचे कारण विचारत आहेत. इंधनाच्या दरात दररोज काही पैशांनी वाढ होत असल्याचे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
-प्रशांत मेलगे (सदस्य बेळगाव पेट्रोल डिलर्स असोसिएशन)









