जून, जुलैमध्ये अर्धा किलो दूध पावडर देणार
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना परिस्थितीमुळे राज्यातील शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना आहारधान्याचे वितरण करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून जून आणि जुलै महिन्यात विद्यार्थ्यांना दूध पावडर वितरीत करण्यात येणार आहे. शुक्रवारी शिक्षण खात्याने दूध पावडर वितरणासाठी अनुदान मंजूर केले आहे, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली.
शाळांमध्ये वर्ग न भरल्याने विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहाराऐवजी आहारधान्ये, खाद्यतेल यासह इतर वस्तू नियमितपणे पुरविण्यात येत आहेत. कोरोना संकटकाळातही सरकारी शाळोतील मुलांना पौष्टीक आहार मिळावा या उद्देशाने जून आणि जुलै महिन्यात सरकारी आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना दरमहा अर्धा किलो दूध पावडर वितरीत होणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पौष्टिक घटकच नव्हे; तर ग्रामीण भागातील दूध उत्पादक, शेतकऱयांची आर्थिक परिस्थितीही सुधारण्यास मदत होणार आहे. सार्वजनिक शिक्षण खात्याच्या आयुक्तांना दूध पावडरची पाकिटे वितरीत करण्याची प्रक्रिया समर्पकपणे राबविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, असेही सुरेशकुमार यांनी पत्रकात उल्लेख केला आहे.
148 क्रीडा शिक्षकांना बढती
सरकारी माध्यमिक शाळांमधील क्रीडा शिक्षकांना निरीक्षकपदी बढती देण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली आहे. राज्यातील सरकारी माध्यमिक शाळेतील क्रीडा शिक्षकांना ग्रेड-1 पदावरून गुप-बी या पदावरील क्रीडा शिक्षक निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. 148 शिक्षकांना याचा लाभ होणार आहे. यापूर्वी 2016 मध्ये बढत्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर पाच वर्षांत क्रीडा शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली नव्हती.









