वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारीच्या प्रभावामुळे देशभरामध्ये विविध व्यवसाय अडचणींमध्ये आले असून यामध्ये काहींचे उत्पादन घटले आहे तर काहींचे थांबले असल्याचे चित्र आहे. यामध्ये विणकाम व सुतगिरणीमध्ये तयार करण्यात येणारे खादीचे उत्पादन हे आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 16 टक्क्यांनी घटून 3,527.71 कोटी रुपयावर पोहोचले आहे. परंतु यामध्येही खादी आणि ग्रामोद्योगाचा एकूण व्यापार मात्र वाढीसोबत सुरु असल्याची माहिती आहे.
सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे 2020-21 मध्ये खादीचे एकूण उत्पादन हे 1,904.49 कोटी रुपयांवर राहिले आहे तर 2019-20 च्या दरम्यान 2,292.44 कोटी रुपयांवर ते होते. खादी क्षेत्रातील उत्पादन आणि विक्रीत हलकीशी घसरण राहिली आहे, कारण महामारीच्या दरम्यान देशभरात या व्यवसायावर परिणाम झाला आहे. गेल्या तीन महिन्यापासून या क्षेत्रातली कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. उत्पादन कारखाने व विक्री पेंदेही लॉकडाऊनमुळे बंद राहिल्याने विक्रीवर त्याचा थेट परिणाम जाणवला आहे. लॉकडाऊन मागे घेतले जात असून लवकरच या क्षेत्रातील व्यवसाय पूर्ववत होणार आहेत.
तर दुसरीकडे खादी साहित्याची एकूण विक्री यंदा 3,527.71 कोटी रुपयांवर राहिल्याची नोंद आहे. ही मागील वर्षी 4,211.26 कोटी रुपयांची होती. दरम्यान खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 95 हजार 741 कोटींची एकत्रित उलाढाल केली आहे. जी मागच्या आर्थिक वर्षात 88 हजार 887 कोटी रुपयांवर राहिली होती.









