मुंबई\ ऑनलाईन टीम
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देत मुख्यमंत्री होण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. दुसरीकडे भाजपाही स्वबळावर निवडणूक लढवत असल्याचं सांगत आहे. यापार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे संकेत दिले. आता यावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचं हित आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं यावरुन पुढील निर्णय घ्यावेत, अशी भूमिका थोरात यांनी मांडली.
बाळासाहेब थोरत म्हणाले की, दोन उद्दिष्टांवर महाविकास आघाडी स्थापन झाली आहे. महाराष्ट्रात विकास घडवून आणणं आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं या दोन गोष्टींवर आम्ही काम करत आहोत. मला असं वाटतं की या दोन गोष्टी केंद्रस्थानी ठेवून आम्हाला पुढील निर्णय घ्यावे लागतील.प्रत्येक पक्षाला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्हाला देखील अधिकार आहे की, आमचा पक्ष वाढवावा, बळकट झाला पाहिजे, संख्याबळ वाढला पाहिजे. त्यासाठी आमचं काम सुरु आहे, असं थोरात यांनी सांगितलं.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी काल (१७ जून) बैठक बोलावली होती. बैठकीत स्वबळावर निवडणूक लढण्याबाबत चर्चा झाली नाही. विधानसभा निवडणुकीला साडे तीन वर्षे वेळ आहे. जिथे पालकमंत्री आहेत, संपर्क मंत्री आहेत, तिथे फिरलं पाहिजे. येणाऱ्या काळात ज्या निवडणुका येणार आहेत. यासाठी पक्ष म्हणून जे काम करायचं आहे, त्यावर लक्ष द्यावं, असं थोरात म्हणाले.
Previous Articleपत्रकारांचे शरद पवारांना साकडे
Next Article ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवा








