राधानगरी / महेश तिरवडे
गेल्या दोन दिवसापासून राधानगरी तालुक्यात व धरण पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरु आहे. या दमदार पावसामुळे तालुक्यातील अनेक ओढे, नाले, व धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यापैकी राऊतवाडी, कासारवाडी, व रामन वाडी (गायकडा ) हे महत्त्वाचे धबधबे प्रवाहित झाले आहेत. याही वर्षी पर्यटकाना डोंगरदऱ्याचे निसर्गाचे मनमोहक रूप, वर्षा पर्यटकाना खुणावू लागलंय परंतु, पर्यटकाना कॊरोनाच्या महामारीमुळे हा आनंद लुटता येणार नाही. कोरोना महामारीमुळे सध्या पर्यटनाला बंदी आहे.
निसर्गाच्या मुक्त हस्ते उधळनीने राधानगरी तालुका पावसाळी पर्यटनासाठी जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षक ठरले आहे. संततधार पाऊस, हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, त्यातून कोसळणारे लहान मोठे धबधबे, दाट धुके असे नयनरम्य वातावरण याठिकाणी असते. राधानगरी, दुधगंगा व तुळशी ही जलाशय निसर्ग सौंदर्यात आणखीन भर टाकतात.
राधानगरी शहरापासून 7 कि.मी अंतरावर असलेला हा राऊतवाडी धबधबा गेल्या दोन दिवसापासून अव्याहत पणे कोसळत आहे. हा धबधबा सुरू झाल्या नंतर पर्यटकाची गर्दी होत असते, विशेषतः शनिवारी रविवारी या सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी असते. मात्र, पर्यटनासाठी हा धबधबा बंद असल्याने पर्यटन व्यवसायावर याचा मोठा परिणाम झाला आहे.
सध्या धबधबा प्रवाहित झाल्यामुळे शनिवारी, रविवारी सुट्टी असल्याने तहसीलदार मीना निंबाळकर यांनी राऊतवाडी पडळी ग्रामस्थांना धबधब्याकडे जाणारा मार्ग बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पर्यटकांची गर्दी होऊ नये म्हणून राधानगरी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
Previous Articleवारणा धरणात १५.९१ टीएमसी पाणीसाठा
Next Article चिंदर भाजपच्यावतीने आचरा विद्युत उपकेंद्रात धडक









