जागतिक आरोग्य संघटना-एम्सच्या सर्वेक्षणाचे अनुमान
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाचा दुसरा उद्रेक नियंत्रणात येत असतानाच तिसरा उद्रेक रोखण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. तिसऱया उदेकात लहान मुलांना संसर्ग अधिक प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. तथापि, जागतिक आरोग्य संघटना आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) संयुक्तरित्या केलेल्या सर्वेक्षणात तिसऱया उद्रेकाचा लहान मुलांवर विशेष परिणाम होणार नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. गुरुवारी ही माहिती देण्यात आली.
हे सर्वेक्षण करण्यासाठी 4 हजार 500 जणांची माहिती एकत्र करण्यात आली होती. तिसरा उद्रेक नेमका कधी होईल हे निश्चित सांगता येत नसले तरी तो लहान मुलांसाठी जितका सांगितला जातो तितका त्रासदायक ठरणार नाही असे दिसून आले आहे. मात्र, सावधगिरी बाळगण्यात कुचराई होता कामा नये, असेही अनेक तज्ञांनी सर्वसामान्यांना बजावले आहे. कोरोना पूर्णतः आटोक्यात येईपर्यंत दक्षता प्रत्येकाला बाळगावीच लागणार असे निक्षून सांगण्यात आले आहे.
कोव्होव्हॅक्सचे प्रयोग जुलैत
लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या कोव्होव्हॅक्स या लसीची परीक्षणे जुलैपासून सुरू करण्यात येतील, असे पुण्याच्या सिरम इन्स्टिटय़ूट या संस्थेने स्पष्ट केले आहे. ही लस नोव्होव्हॅक्स ही अमेरिकन कंपनी आणि सिरमकडून संयुक्तरित्या विकसीत करण्यात येत आहे. ती 12 ते 17 या वयोगटातील मुलांसाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे. या परीक्षण प्रक्रियेत 3 हजार जणांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.
सुरक्षितता तपासणार
या लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी ही परिक्षणे करण्यात येणार असून ती साधारणः दोन आठवडे चालतील. त्यानंतर त्वरित परिणाम तपासला जाईल. लस यशस्वी झाल्यास ती बालकाना देण्याचा प्रारंभ त्यानंतर दोन महिन्यांमध्ये घेण्यात येणार आहे.
तिसरा उद्रेक महाराष्ट्रात लवकरच ?
कोरोनाचा तिसरा उद्रेक प्रारंभी महाराष्ट्रात येत्या 4 ते 6 आठवडय़ांमध्ये होइऊल असे अनुमात व्यक्त करण्यात आले आहे. महाराष्ट्रात बुधवार संध्याकाळ ते गुरुवार संध्याकाळ या चोवीस तासांच्या कालावधीत नव्या बाधितांची संख्या वाढली असून ती 10 हजारांवर पोहचली आहे. ही तिसऱया उद्रेकाची सुरवात आहे की नाही हे सांगता येत नसले तरी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.









