मुख्यमंत्र्यांचे ठोस आश्वासन : सुधारित आदेश जारी करण्याची अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील 74 महिला सांत्वन केंदे बंद करण्याचा आदेश मागे घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिले आहे. कर्नाटक राज्य महिला सांत्वन केंद्र संघटनेच्या पदाधिकाऱयांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी महिला सांत्वन केंद्रे रद्द करण्यासंबंधी दिलेला आदेश मागे घेण्यासंबंधीचा सुधारित आदेश जारी करण्याची सूचना अधिकाऱयांना दिली.
अन्याय, छळ, अत्याचार व इतर कारणांमुळे संकटग्रस्त झालेल्या महिलांच्या मदतीसाठी राज्य सरकारने 2001 मध्ये स्वयंसेवी संघटना-संस्थांच्या सहकार्याने राज्यभरात 194 महिला सांत्वन केंद्रे (हेल्पलाईन) सुरू केली होती. प्रत्येक केंद्रासाठी ठराविक अनुदान दिले जात होते. यामुळे संकटग्रस्त महिलांच्या बाजूने कोणीही उभे रहात नसतील तर सांत्वन केंद्रे त्यांच्या जीवनाला उभारी देण्यासाठी प्रयत्न करत असत.
मात्र, राज्यातील 194 पैकी 74 महिला सांत्वन केंद्रे एप्रिलपासून बंद करण्यात आली आहेत. ही केंद्रे बंद करण्यासंबंधीचा आदेश मागे घ्यावा, अशी विनंती केंद्रांच्या पदाधिकाऱयांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या भेटीप्रसंगी राज्य महिला सांत्वन केंद्र संघटनेच्या अध्यक्षा डॉ. एम. विजया, सचिव एम. भीमय्या आदी उपस्थित होते.









