दक्षिण आफ्रिकेच्या गावात हिरा मिळाल्याची अफवा
दक्षिण आफ्रिकेच्या क्लाजुलू नताल प्रांतात विचित्र प्रकार घडला आहे. येथील एक हजारांहून अधिक लोक मागील दोन दिवसांपासून हिऱयाच्या शोधात क्वालाथी गावात खोदकाम करत आहेत. सोमवारी एका व्यक्तीला खोदकाम करताना हिऱयासारखा दगड मिळाला होता. हे वृत्त काही वेळातच गाव आणि परिसरात आगीप्रमाणे पसरले.

यानंतर लोक फावडं आणि कुदळ घेऊन गाव आणि भोवतालच्या परिसरात खणू लागले. काही लोकांना हा दगड मिळाला देखील. पण हे हिरे नव्हते. तज्ञ या दगडांना क्वार्ट्स क्रिस्टल ठरवत आहेत. ही मूल्यवान दगड आमच्या भागाचे नशीब उजळवतील असे स्थानिक लोकांचे मानणे आहे.
तर ज्या लोकांना हे दगड मिळाले, त्यांनी या दगडांना 300 रँडमध्ये (सुमारे 1500 रुपये) विकण्यास प्रारंभ केला आहे. याचदरम्यान प्रांतीय सरकारने लोकांना तेथून हटविण्यासाठी आणि भागाची तपासणी करण्यासाठी पथक पाठविले आहे.









