प्रतिनिधी / सातारा :
सध्या देशभरात ऑक्सिजन अभावी अनेक रूग्णांचा मृत्यू होत आहे. महाराष्ट्रातही कोरोना रूग्णांवर उपचार करताना ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता, याचीच दखल घेत एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील एमआयटी स्कूल ऑफ इंजीनिअरिंगचे प्रा. डॉ. राजेश जाधव यांनी प्रायोगिक तत्वावर वातावरणातील घटक एकत्र करून ”स्प्रेशर स्विंग ऍडसॉर्प्शन” तंत्रज्ञानाचा वापर करून ऑक्सिजन तयार करणारे सयंत्र विकसित केले आहे. यासाठी ”एक्स्ट्रिम इंजिनिअरिंग अक्विपमेंट’ या कंपनीने सहकार्य केले आहे.
डॉ. राजेश जाधव हे मुळचे सातारा येथील वाई तालुक्यातील परखंदी गावचे रहिवासी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण अनंत इंग्लिश स्कूल सातारा, तसेच महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेज सातारा, आणि पदव्युत्तर शिक्षण आबासाहेब गरवारे कॉलेज पुणे व पीएचडी एसएसआयएमएस भोपाळ येथुन संपादन केली आहे.
याविषयीची अधिक माहिती देताना डॉ. जाधव म्हणाले, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर) मार्गदर्शक तत्वाचे पालन करून आम्ही या ऑक्सिजन प्लांटची निर्मिती केली आहे. यात आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचे उत्पादन वाढविता अथवा कमी करता येणार आहे. तसेच यात वायुसंवेदन आणि पीएलसी तंत्रावर आधारित अलार्म सिस्टम बसविण्यात आले आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या आणि त्यांना लागणाऱ्या ऑक्सिजनची कमी पूर्ण करण्यासाठी या प्लांटचा लाभ होणार आहे. वैद्यकीय वापरासाठी 93 टक्के ऑक्सिजनची धनता मिळणार आहे. या सयंत्रावर डिजिटल डिस्प्ले बसविण्यात आले आहे. याद्वारे ऑक्सिजनची शुद्धता आणि दबाव लक्षात येण्यास मदत होणार आहे.
ऑक्सिजन प्लांटचे कार्य
सर्वप्रथम संयत्रांमध्ये योग्य दाबाने हवा संकलित (कॉम्प्रेस) केली जाते. त्यानंतर ती हवा शुद्ध (फिल्टर) करण्यात येते. त्यामुळे हवेतील अशुद्ध घटक जसे की, धूळ, तेल, इंधन यांचे अतिसूक्ष्म कण, इतर अयोग्य घटक गाळून वेगळे केले जातात. या प्रक्रियेनंतर उपलब्ध झालेली शुद्ध हवा ‘ऑक्सिजन जनरेटर’मध्ये संकलित केली जाते. ऑक्सिजन जनरेटरमध्ये असलेल्या झिओलीट या रसायनयुक्त मिश्रणाद्वारे या शुद्ध हवेतून नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन्ही वायू वेगळे केले जातात. वेगळा करण्यात आलेला ऑक्सिजन अर्थात प्राणवायू हा योग्य दाबासह स्वतंत्रपणे साठवला जातो. तेथून तो पाईपद्वारे रुग्णांपर्यंत पोहोचवला जातो.









