वार्ताहर /हुबळी
इंडिगो विमानाचा टायर फुटल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरल्याची घटना सोमवारी रात्री हुबळी विमानतळावर घडली. केरळच्या कण्णूर येथून निघालेले विमान हुबळी येथील विमानतळावर लँडिंग होत असताना टायर फुटला. मात्र, पायलटने प्रसंगावधान राखून विमानावर नियंत्रण आणल्याने सर्व प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
इंडिगो 6 इ 7979 या क्रमांकाचे विमान उतरविण्यात येत असताना त्याचा टायर फुटला. त्यामुळे विमानातील प्रवासी घाबरले. सोमवारी रात्री 8.34 च्या सुमारास ही घटना घडली. रात्री 8 वाजता पायलटने विमान उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पावसामुळे विमानाचे लँडिंग करणे शक्य झाले नाही. त्यामुळे विमान काहीवेळ आकाशातच घिरटय़ा घालत राहिले. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर विमान उतरविण्यात येत असतानाच ही दुर्घटना घडली. या विमानात केवळ 7 प्रवासी होते. मात्र, पायलटने विमानावर नियंत्रण आणल्याने अनर्थ टळला. या घटनेमुळे रात्रीचे बेंगळूरला जाणारे विमान रद्द करण्यात आले.









