प्रतिनिधी / काणकोण
गेल्या मार्चपासून बंद असलेले चावडीवरील मासळी आणि भाजी मार्केट खुले कधी होते याची वाट या दोन्ही मार्केटमध्ये व्यवहार करणारे विक्रेते बघत आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुरुवातीला स्थानिक नागरिकांनी केलेले स्वेच्छा लॉकडाऊन आणि त्यानंतर सरकारने जाहीर केलेला कर्फ्यू यामुळे मासळी आणि भाजी मार्केट दोन्ही मागच्या अडीच महिन्यापासून बंदच आहेत.
जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत जनतेची गैरसोय टाळण्यासाठी भाजीविपेत्यांना रस्त्याच्या बाजूला वाहतुकीला अडथळा होणार नाही याची खबरदारी घेऊन बसून व्यवहार करायला पालिका तसेच सरकारी यंत्रणेने परवानगी दिली आहे. तर मासळीविपेत्या सरळ पणसुले मार्गावर बाजूला बसून आपला व्यवसाय करायला लागल्या आहेत. दोन्ही ठिकाणी सामाजिक अंतराचे भान ठेवूनच खरेदी केली जात असून पोलीस कर्मचारी त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करत आहेत.
दोन्ही मार्केट बंद असल्यामुळे ज्या व्यक्तीने काणकोण पालिकेच्या सोपो कराचा ठेका घेतलेला आहे त्याच्या महसुलावर परिणाम झालेला असून त्याच्या मूळ रकमेत पालिकेने सूट द्यायला हवी अशी मागणी करण्यात येत आहे. चावडीवरील भाजी मार्केटमध्ये विशेषता गावडोंगरी, खोतीगाव, पैंगीण आणि अन्य भागांतील महिला फळ-भाजीविक्री करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असत. हे मार्केट बंद झाल्यामुळे त्यांच्यावरही परिणाम झालेला आहे. गोव्याच्या अन्य बऱयाच भागांतील मार्केट खुली करण्यात आलेली असून सरकारने जे निर्बंध घातलेले आहेत त्यांचे पालन करून काणकोण पालिका क्षेत्रातील भाजी मार्केट आणि मासळी मार्केट खुली करण्यात यावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर एकदा मासळी मार्केट खुले झाले की, मार्केट सोडून बाहेर उघडय़ावर जी मासेविक्री केली जाते त्यावर पालिकेने कडक निर्बंध घालावेत अशी मागणी काही जणांनी केली आहे.









