शिक्षण विभागाने वर्क फ्रॉम होमसाठी दिली सवलत : ऍडमिशन प्रक्रियाही ऑनलाईन
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता. परंतु या निर्णयाला प्राथमिक शिक्षक संघटनेने राज्यस्तरावर तीव्र विरोध केला होता. अनेक शिक्षक इतर जिल्हय़ांमध्ये अडकून पडल्याने हा आदेश मागे घेण्याची मागणी होत होती. सोमवारी सकाळी शिक्षण विभागाकडून एक आदेश जारी केला गेला असून ज्या जिल्हय़ांमध्ये अद्याप लॉकडाऊन आहे, अशा जिल्हय़ांतील शिक्षकांना वर्क फ्रॉम होम व ऑनलाईन ऍडमिशन प्रक्रिया राबविण्याची सवलत देण्यात आली आहे. यामुळे शिक्षकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने 15 जूनपासून शाळा सुरू करून पुढील वषीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्याचे आदेश शिक्षकांना दिले होते. परंतु अद्यापही अनेक जिल्हय़ांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने सरकारच्या निर्णयाला विरोध होत होता. वाहतुकीची व्यवस्था नसल्याने अनेक शिक्षक अद्याप इतर जिल्हय़ांमध्ये अडकून आहेत. ज्या जिल्हय़ांमध्ये सक्रिय रुग्ण अधिक आहेत, अशा ठिकाणी शाळा सुरू करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न शिक्षक संघटनांकडून उपस्थित केला जात होता.
मंगळवारपासून शाळा सुरू कराव्या लागणार असल्याने शिक्षकांनी तशी तयारीही सुरू केली. परंतु सोमवारी दुपारी शिक्षण विभागाने नवा आदेश बजावून ज्या जिल्हय़ांमध्ये लॉकडाऊन अद्याप कायम आहे अशा जिल्हय़ांमधील शिक्षकांना मुभा दिली आहे.
शिक्षकांनी घरीच राहून दहावी व इतर वर्गांचे अद्यापन व मार्गदर्शन करावे. इतर वर्गांचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करून घेण्याच्या सूचना नव्या आदेशामध्ये करण्यात आल्या आहेत.









