भरपावसात गटार साफ करण्याचे काम वाहतूक पोलीस गेले होते कुठे
प्रतिनिधी / पणजी
सार्वजनिक बांधकाम खाते व वाहतूक पोलीस विभागाच्या बेफिकीर कारभारामुळे राजधानीत काल सोमवारी वाहतुकीचा खोळंबा झाला. सकाळपासूनच पणजी शहरात येणाऱया वाहनचालकांना नाहक त्रास सोसावा लागला. पणजीत येणाऱया मुख्य रस्त्यावरील गटार साफ करण्याच्या कामाला सकाळपासून सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक ठप्प होऊन सर्वत्र वाहने अडकून पडली. तरीही वाहतूक पोलीस कुठेच दिसत नव्हते. वाहनचालक संताप व्यक्त करीत होते.
दयानंद बांदोडकर रस्त्यावर पोस्ट ऑफिसच्या जुन्या इमारती समोर सार्वजनिक बांधकाम खात्याने भरपावसात गटार साफ करण्याचे काम सुरु केल्याने सोमवारी सकाळपासूनच वाहतूक ठप्प झाली. सोमवार कामाचा दिवस असल्याने मोठय़ा संख्येने पणजीत येणारा कर्मचारीवर्ग अर्ध्या वाटेवर अड़कून राहिला होता. मळा, पणजी परिसरात सर्वत्र वाहने अडकून राहिली होती. सर्व रस्त्यांवर चक्काजाम झाला होता. एखाद्या दुचाकी स्वरालाही कदंब बसस्थानक ते पणजी बाजारात येण्यासाठी किमान अर्धा तास लागत होता. वाहनचालकांना नाहक सोसाव्या लागलेल्या या त्रासाला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वाहतूक ठप्प, त्यात पावसाची भर
पावसामुळे रस्त्यावर साचत असलेले पाणी मांडवीत जावे म्हणून दयानंद बांदोडकर रस्त्यावर असलेले मोठे गटार साफ करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे करण्यात येत आहे. मात्र काम करण्याची चुकीची वेळ असल्याने त्याचा त्रास वाहनचालकांना सोसावा लागला. एक तर रस्ता जाम, त्यात भर म्हणून मुसळधार पाऊस, या साऱया प्रकारामुळे वाहनचालकांच्या नाकीनऊ आले होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीसही नव्हते. प्रत्येकजण लवकर पोचण्याच्या गडबडीत मिळेल त्या ठिकाणाहून वाहने काढण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे आणखी अडचण निर्माण होत होती. काही ठिकाणच्या रत्यावर भले मोठे खड्डे असल्याने अनेकांची वाहने खडय़ातही जात होती. या साऱया प्रकाराला कंटाळून प्रत्येक वाहन चालक संताप व्यक्त करीत होता.
वाहतूक पोलिसांचा बेजबाबदारपणा
घडलेला प्रकार हा संतापजनक होता. त्यामुळे प्रत्येकजण बांधकाम खात्याच्या नावाने बोटे मोडत होता. वास्तविक रस्त्यावरील काम करीत असताना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस त्या ठिकाणी असणे आवश्यक असते मात्र वाहतूक पोलीसही कुठे दिसत नव्हते. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांना विचारले असता वाहतूक पोलीस विभागाने काम करण्यासाठी परवाना दिला असल्याचे त्यांनी सांगितले. जर वाहतूक पोलिसांनी काम करण्यासाठी मान्यता दिली होती तर काम सुरु करताना वाहतूक पोलीस उपस्थित का नव्हते हा वाहतूक विभागाचा बेजबाबदारपणा नव्हे का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे काम चुकीच्यावेळी
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. या काळात पणजी शहरात केवळ सकाळच्या सत्रात तुरळक वाहतूक होती. संध्याकाळच्या सत्रात वाहतूक बंदच असायची. हा प्रकार 9 मे ते 7 जून पर्यंत सुरु होता. या काळात हे काम का केले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकूणच सार्वजनिक बांधकाम खात्याने चुकीच्या वेळी काम सुरु केल्याने त्याचा त्रास वाहनचालकांना सोसावा लागला.









