प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील प्रत्येक घरात मोफत रेशन पॅकेटचे वितरण करण्याचे लक्ष्य घेऊन आम आदमी पक्षाने काल सोमवारी कोविड मदत अभियान सुरू केले. कोविड, लॉकडाउन आणि आर्थिक मंदी अशा अनेक संकटांमुळे गोवेकर कुटुंबांना मोठा त्रास झाला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आपने सामान्य जनतेला आर्थिक मदत मिळावी म्हणून अनेकदा आवाहन केले होते, मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने आता आपने हे पाऊल उचलले, असे आपचे निमंत्रक राहूल म्हांबरे यांनी म्हटले आहे.
या मोहिमेचा एक-कलमी अजेंडा हाच आहे की, कोणताही गोंयकर भुकेला राहणार नाही हे सुनिश्चित करणे. गेल्या दोन महिन्यांपासून कोविड मदतकार्य करताना, आम्ही सामान्य माणसाला होणाऱया वेदना पहिल्या आहेत. आमच्या गोयंकर बंधू-भगिनींना आधाराची गरज आहे आणि हा आधार देण्याची जबाबदारी सरकारची आहे. आम्ही भाजप सरकारला अनेक वेळा सामान्य जनतेला आर्थिक दिलासा द्यावा, असे आवाहन केले. पण ते कर्णबधिरांच्या कानावर पडले आहे. सावंत सरकारने गोयंकरांची दुर्दशा समजून घ्यावी, याची आता वाट गोयंकरांना पाहता येणार नाही, त्यामुळे आम आदमी पार्टी आता जे भाजपा सरकार करू शकली नाही ते करत आहे, असे ते म्हणाले.
योजनेसाठी 7504750475 हेल्पलाइन
हे अभियान केवळ 7504750475 या एका हेल्पलाइनवर सुरु नसून मोठय़ा प्रमाणात राबविले जात आहे, कुणालाही वगळले जाऊ नये यासाठी प्रत्येक गावात घरोघरी जाऊन आपच्या टीम्स काम करत आहेत. प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तीन मतदारसंघात पायलट प्रकल्प राबविण्यात आले. एकूण 40 व्हॅन यासाठी सेवेत आहेत आणि 1,000 हून अधिक कार्यकर्ते ग्राम प्रधान यांच्या समन्वयाने घरोघरी रेशन पुरवत आहेत. प्रत्येक पॅकमध्ये पीठ, कडधान्य, साखर, मीठ इत्यादी सारखा सुमारे 10 किलोचा कोरडा किराणा आहे, असे कॅप्टन व्हिएगास म्हणाले.
म्हांबरे यांनी काल सोमवारी पहिल्या 20 वाहनांना पणजीतील पक्षाच्या कार्यालयातून हिरवा झेंडा दाखविला. यावेळी त्यांच्यासह राज्य नेते ऍड. प्रतिमा कौटिन्हो, अ?Ÿड. सुरेल तिळवे, कॅप्टन वेंझी व्हिएगास, शुभम शिवलकर, वाल्मिकी नाईक, मॅनुअल कार्डोजो, संदेश तेलेकर, श्रीपाद पेडणेकर आदी उपस्थित होते.









