- या लसीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ शुल्क
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. त्यातच एक चांगली बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत मंगळवार म्हणजेच 15 जून पासून रशियामधील कोरोना प्रतिबंधात्मक लस ‘स्पुटनिक व्ही’ देखील नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. लसीचे एक हजार डोस दिल्लीत पोहचले आहेत. यातील 170 लसींचे डोस हे डॉ. रेड्डी यांच्या लॅबमधील कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत.

दिल्लीत आतापर्यंत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस दिली जात होती. दिल्लीत ‘स्पुटनिक व्ही’ ची किंमत 1145 रुपये प्रति डोस इतकी असणार आहे. सध्या तरी ही लस इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमध्येच उपलब्ध असेल.
रुग्णालयातील एका डॉक्टरांनी सांगितले की, सोमवार संध्याकाळपर्यंत लसीची खेप हॉस्पिटलमध्ये दाखल होईल तसेच ‘स्पुटनिक व्ही’ कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत दिली जाईल हे लसीच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान देशात 17 मे पासून रशियन लस प्रायोगिक तत्त्वावर वापरली जात आहे. ही लस अपोलो हॉस्पिटल आणि डॉ. रेड्डी लॅब यांच्या संयुक्त कार्यक्रमाअंतर्गत दिली जात आहे. भारतात डॉ. रेड्डी लॅबोरेट्रीज ‘स्पुटनिक व्ही’ लसीचे उत्पादन करीत आहे. कंपनीच्या हैदराबाद आणि विशाखापट्टणम मधील प्लांटमध्ये यावर काम चालू आहे.









