म्हैसूर/प्रतिनिधी
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण हाच एक पर्याय असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. देशात दुसऱ्या लाटेचा प्रसार वेगाने होत आहे. दरम्यान कोरोनावर मात करण्यासाठी सर्वत्र लसीकरण सुरु आहे. कर्नाटकातही १८ ते ४४ आणि त्यावरील वयोगटासाठी लसीकरण सुरु आहे. तसेच तिसऱ्या लाटेत बालकांना कोरोनाचा धोका जास्त असल्याचे बोलले जात आहे. यासाठी खबरदारी म्हणून १२ ते १८ वयोगटासाठी लसीकरण ट्रायल घेतली आहे आणि ती यशस्वी झाली आहे.
दरम्यान कर्नाटकात १२ ते १८ वर्षे वयाच्या बालकांना देण्यात आलेली लस यशस्वी झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. ६ जून रोजी या बालकांना पहिला डोस देण्यात आला. निवडलेल्या ५३ बालकांपैकी ३० जणांना चेलुवांबा हॉस्पिटलमध्ये लस देण्यात आली. ती सर्व बालके आता ठीक आहेत. त्यांच्या पालकांशी वरचेवर फोनवरून चौकशी करण्यात येत होती. २०८ दिवस ही मुले देखरेखीखाली असणार आहेत. यापुढे अन्य २० जणांना लस देण्यात येणार आहे. यापुढे असाच प्रयोग लहान मुलांवरदेखील करण्यात येणार आहे.