प्रतिनिधी/ पणजी
गत सुमारे महिन्याभरापासून बंद असलेले पणजीचे मासळी मार्केट उद्या सोमवारपासून खुले करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक प्रमेय माईणकर यांनी दिली आहे.
सोमवारपासून मासळी मार्केट खुला करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या असून मनपाकडे नोंदणीकृत असलेल्या मासेविक्रेत्यांनाच मार्केटमध्ये व्यवसाय करण्यास मान्यता देण्यात येणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
महापालिका बाजार संकूल अनेक निर्बंधांसह गत सोमवारपासून खुले करण्यात आले आहे. भाजी, फळे, नारळ, आणि अन्य जीवनावश्यक वस्तू विकणाऱया किरकोळ विक्रेत्यांना दुकाने खुली करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत दुकाने खुली राहणार असून कोविडच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बाजार संकुलात ग्राहकांची गर्दी होऊ नये यासाठी एकावेळी 50 पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश देण्यात येत नाही. त्यानंतर जेवढे लोक बाहेर येतील तेवढय़ाच नव्या ग्राहकांना आत प्रवेश देण्यात येतो. बाजार संकुलाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांचीही देखरेख असल्यामुळे ग्राहकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य होत आहे. त्याच बरोबर दुपारी 3 पर्यंतच बाजारातील दुकाने खुली ठेवण्यास मान्यता देण्यात आल्याने जास्त काळ एखादे दुकान खुले ठेवल्यास मनपा कर्मचारी लगेच कारवाई करत असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, उद्यापासून कर्फ्यू कालावधी संपुष्टात येत असून त्यात वाढ न झाल्यास सर्व व्यवहार नियमित होण्याची शक्यता आहे.









