ग्राम पंचायतीने तातडीने लक्ष देणे गरजेचे
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीमुळे अनेक नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच बदलत्या वातावरणामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. मात्र नंदिहळळी परिसरात गटारींची स्वच्छता करण्यात येत नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गटारींची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
ग्राम पंचायतीने तातडीने कर्मचाऱयांना सांगून गटारी स्वच्छता मोहीम हाती घेण्याची गरज व्यक्त होत आहे. नंदिहळळी गावात गटारी तुडुंब भरल्याने ते पाणी रस्त्यावरून वाहताना दिसत आहे. याचा परिणाम आरोग्यावर होताना दिसत असून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
गेल्यावषी पावसाचे पाणी रस्त्यावरच तुंबून रस्त्याला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. तर यावषीही अशीच अवस्था होणार आहे. पावसाळय़ापूर्वी येथील गटारी जर स्वच्छता केल्यास सोयीचे ठरणार आहे. मागील अनेक वर्षांपासून येथील गटारी स्वच्छ कराव्यात, अशी मागणी करूनही याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही. वारंवार सांगूनही ग्राम पंचायतीने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गावातील पाटील गल्ली व लोंढे गल्लीमध्ये ही समस्या कायम आहे. महत्त्वाचे म्हणजे गावातील मुख्य रस्त्यावरच ही समस्या आहे. येथे काही दुकानेही आहेत. दुकानदारांबरोबरच ग्राहकांनाही याचा फटका सहन करावा लागला आहे. पाटील गल्लीपासून ते थेट बस स्थानकापर्यंत ही समस्या कायम आहे. गटारींची स्वच्छता करून पाणी निचरा होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.









