गणेश चतुर्थीसाठी चाकरमानी आतूर : कोकण रेल्वेच्या सर्व गाडय़ा फुल्ल
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
गणेशोत्सव हा कोकणात घरोघरी अमाप उत्साहात साजरा होणारा सण. प्रसंगी उसनवार करून सण आनंदाने साजरा करणाऱया आपल्या कोकणच्या संस्कृतीतील हा मानाचा सण. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे गतवर्षीपासून त्यावर काही बंधने आली. यावर्षी 10 सप्टेंबर रोजी गणेशोत्सव आहे. गतवर्षीपेक्षा यंदा कोरोनाचे संकट अधिक गडद आहे. तरीही गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना गावची ओढ लागली आहे. कोकण रेल्वेने आतापर्यंत जाहीर केलेल्या गाडय़ांचे गणेशोत्सवासाठीचे आरक्षण फुल्ल झाले आहे.
दरवर्षी गणेशोत्सवाला येताना आणि जाताना रेल्वेचे आरक्षण मिळणे ही एक लढाई जिंकल्याच्या आनंदाएवढे असते. गतवर्षीपासून गणेशोत्सवावरही थोडी बंधने आली. तरीही आपल्याकडील गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत व चाकरमान्यांच्या येण्यात फारसा फरक पडला नाही.
400 पर्यंत वेटिंग
कोकण रेल्वेने कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱया चाकरमान्यांना काही विशेष गाडय़ा म्हणजेच पूर्वीच्या नियमित, पण आता कोरोनामुळे विशेष गाडय़ा सोडण्याचे ठरविले आहे. यासाठीचे आगावू आरक्षण सुरुही झाले. 5 ते 9 सप्टेंबर या कालावधीतील सर्वच गाडय़ांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. काही अपवादात्मक गाडय़ांच्या एसी टू व थ्री टायरच्या काही जागा शिल्लक असल्या, तरीही उर्वरित सर्वच क्लाससाठी सर्वच गाडय़ांना 25 पासून 400 पर्यंत वेटिंग आहे. काही गाडय़ांचे वेटिंगही जास्त झाल्याने वेटिंग तिकीटही बंद होऊन गाडी ‘रिग्रेट’ झाली आहे.
येते-जाते आरक्षण फुल्ल
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, सद्यस्थितीत दिवा पॅसेंजर व डबलडेकर बंद आहे. तर उर्वरितमध्ये मेंगलोर, कोकणकन्या, तुतारी, मांडवी, मंगला, गुरुवारची दादर- तिरुनवेली अशा गाडय़ा विशेष गाडय़ा म्हणून धावणार आहेत. या सर्व गाडय़ांची वेटिंग लिस्ट मोठी आहे. साधारणत: 5 ते 9 सप्टेंबर या कालावधीतील हे आरक्षण आहे. तर परतीच्या प्रवासासाठीही 14 पासून पुढील सहा सात दिवसांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. या सर्व गाडय़ा जरी नियमित असल्या, तरीही त्या विशेष म्हणून धावणार असल्याने त्यांना सवलती मिळत नाहीत, असे सांगण्यात आले.









