21 जूनपर्यंत लागू असणार नियमावली : कृषी, बांधकाम व्यवसायाला मर्यादित स्वरूपात मुभा : मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची घोषणा
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने बेळगाव जिल्हय़ासाठी आणखी सात दिवसांचा लॉकडाऊन वाढविला आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी गुरुवारी सायंकाळी बेंगळूर येथे यासंबंधीची घोषणा केली असून 21 जूनच्या सकाळी 6 पर्यंत जिल्हय़ात लॉकडाऊनचे नियम लागू असणार आहेत.
गुरुवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांशी चर्चा करून सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला होता. यावेळी उपमुख्यमंत्री तथा बेळगावचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी रुग्णसंख्या कमी होईपर्यंत आणखी एक आठवडा लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली होती.
11 जिल्हय़ांमध्ये लॉकडाऊनमध्ये वाढ
व्हिडीओ कॉन्फरन्सच्यावेळी अधिकारी व तज्ञांशी चर्चा करून यासंबंधी निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा सांगितले होते. आपल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर बेळगावसह 11 जिल्हय़ांमध्ये एक आठवडय़ासाठी लॉकडाऊन वाढविण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी केली आहे.
जिल्हय़ाचा पॉझिटिव्हिटी दर 9 टक्क्मयांवर
याआधी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार 14 जून रोजी लॉकडाऊन संपायला हवा होता. बेळगाव हा महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवरील जिल्हा आहे. सध्या जिल्हय़ाचा पॉझिटिव्हिटी दर 9 टक्क्मयांवर आहे, तो आणखी खाली उतरण्याची गरज आहे. त्यामुळे आणखी किमान 1 आठवडा
लॉकडाऊन वाढविण्यात यावा. बांधकाम व्यवसाय, शेती, ऑटोमोबाईलना मुभा देऊन लॉकडाऊन वाढविण्याची विनंती पालकमंत्र्यांनी केली होती.
मुख्यमंत्र्यांनी बेळगावसह 11 जिल्हय़ात आणखी एक आठवडय़ासाठी लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली आहे. मात्र कृषी, बांधकाम व्यवसायाला मर्यादित स्वरूपात मुभा असणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे बेळगावकरांना आणखी एक आठवडा लॉकडाऊनमध्ये राहावे लागणार आहे.









