केवळ महिन्याभरात 204 जणांना बाधा : पालकमंत्री गोविंद कारजोळ यांची माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाबाधितांची संख्या घटत असतानाच ब्लॅक फंगसची लागण झालेल्या रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. गेल्या महिन्याभरात जिल्हय़ातील 15 जणांचा ब्लॅक फंगसने मृत्यू झाला आहे. पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
आतापर्यंत जिल्हय़ात 204 ब्लॅक फंगसचे रुग्ण आढळून आले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 110 व खासगी इस्पितळांत उपचार घेणाऱया 94 जणांमध्ये ब्लॅक फंगस आढळून आला आहे. यापैकी 61 जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 151 जण सरकारी व खासगी इस्पितळांत उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत उपचारांती 32 जण पूर्णपणे बरे झाले आहेत.
तज्ञ डॉक्टरांअभावी ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांची मदत घेऊन शस्त्रक्रिया करण्यास सांगण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरात 15 जण दगावले असून सरकारी व खासगी इस्पितळांत उपचार घेणाऱया ब्लॅक फंगसच्या रुग्णांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान यासंबंधी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बुधवारी सायंकाळी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून
ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक
ऍम्फोटेरीसीन-बी लसींचे 743 वॉईल सरकारी इस्पितळाला तर 547 वॉईल खासगी इस्पितळांना वितरित केले आहे. 1 एप्रिलपासून आतापर्यंत सरकारी इस्पितळांना 14 हजार 334 रेमडेसिवीर तर खासगी इस्पितळांना 22 हजार 616 वॉईल पुरविले आहेत.
ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टरांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे हुबळी येथील किम्स्मधील पीजींची सेवा घेण्यासाठी पत्र क्यवहार सुरू आहे.
1308 गावांमध्ये स्वॅब तपासणी
कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हय़ात स्वॅब तपासणीचा वेग वाढविण्यात आला आहे. 1308 गावांमध्ये रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट हाती घेण्यात आली आहे. 24 मे पासून या अभियानाला चालना देण्यात आली होती. आतापर्यंत 56 हजार 884 जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली असून त्यापैकी 2 हजार 358 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 38 हजार 633 जणांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली असून एकूण 95 हजार 517 जणांची तपासणी केली आहे.
34 कोटींचे अनुदान मंजूर
कोरोनापरिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारने 34.39 कोटींचे अनुदान जिल्हय़ासाठी मंजूर केले आहे. त्यापैकी 26.74 कोटी खर्च झाला आहे. अद्याप 7.65 कोटी अनुदान शिल्लक असल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली आहे.









