कोरोना पॉझिटिव्हिटी दर 5 टक्क्यांपेक्षा कमी असणाऱया जिल्हय़ांना प्राधान्य : मंत्री आर. अशोक यांची माहिती
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोना नियंत्रणासाठी जारी करण्यात आलेला लॉकडाऊन 14 जूनपासून हळूहळू शिथिल करण्यात येणार आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दराच्या आधारे राज्यात 5 टप्प्यात ‘अनलॉक’ची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री आर. अशोक यांनी बुधवारी दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या जिल्हय़ांमध्ये अनलॉक करण्यासंबंधी मंगळवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे. अचानक अनलॉक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
राज्यात 14 जूनपर्यंत लॉकडाऊन जारी आहे. एकाचवेळी अनलॉक जारी केल्यास कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे 5 टप्प्यात अनलॉकचा विचार सुरू आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी शनिवार दि. 12 जून रोजी तज्ञांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत अनलॉकविषयी निर्णय घेण्यात येणार आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या कालावधीत वाढ, मर्यादित उद्योगांना मुभा, बार-रेस्टॉरंट, गार्डनमध्ये वॉकिंगसाठी परवानगी देण्याबाबत मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत चर्चा झाली आहे. मात्र, मुख्यमंत्रीच अनलॉकसंबंधीचा निर्णय घेणार आहेत, असे मंत्री आर. अशोक यांनी सांगितले.
संसर्ग कमी असणाऱया जिल्हय़ांमध्ये टप्प्याटप्प्याने अनलॉक जारी करण्याबाबत गुरुवारी येडियुराप्पा जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत सीईओ, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते बेंगळुरात वरिष्ठ मंत्र्यांची बैठक घेऊन चर्चा करतील. कोरोना पॉझिटिव्हिटी दर 5 टक्क्यांच्या खाली असणाऱया जिल्हय़ांमध्ये अनलॉकची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सांगितले आहे. त्यानुसार बेंगळूर शहर, बेंगळूर ग्रामीण, गुलबर्गा, बिदर, यादगीर, चामराजनगर आणि रामनगर हे सात जिल्हे पहिल्या टप्प्यात अनलॉक होतील. तर 10 टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी दर असणाऱया जिल्हय़ांमध्ये 14 जूननंतरही पुढील 7 दिवसांपर्यंत कडक निर्बंध जारी राहण्याची शक्यता आहे. 5 टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हीटी दर असणारे जिल्हे अनलॉक झाले तरी कोरोना नियंत्रणासाठी सरकार नाईट कर्फ्यू जारी करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणासह देशातील काही राज्ये टप्प्याटप्प्याने अनलॉक होत आहेत. याच धर्तीवर कर्नाटकातही अनलॉक करण्यात येणार आहेत. कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर 5 टक्क्यांपेक्षा कमी असणाऱया जिल्हय़ांमध्ये 50 टक्के उद्योगांना मुभा देण्यात येण्याची शक्यता आहे. तर 10 टक्क्यांपर्यंत पॉझिटिव्हीटी दर असणाऱया जिल्हय़ातील वाणिज्योद्योग मर्यादित प्रमाणात सूट मिळण्याची शक्यता आहे.
किराणा दुकाने, भाजी-फळे, फुले विक्रीसाठी दिवसभर परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तर ज्वेलरी दुकाने, कपडे, इलेक्ट्रीकल, निर्मिती सामुग्रीची दुकाने, मोबाईल विक्री दुकाने, गॅरेजना देखील काही अटींवर मुभा मिळण्याची शक्यता आहे. बस, मेट्रो रेल्वे, कॅब, टॅक्सी, ऑटो रिक्षा, हॉटेल, बार-रेस्टॉरंटमध्ये एकूण क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांना प्रवेश देण्याची अट लागू करण्यात येणार असल्याचे समजते. कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करून सरकारी कार्यालये पूर्णवेळ सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे.









