प्रतियुनिट सरासरी 30 पैसे वीजदरवाढ : ‘केईआरसी’कडून दरवाढीला हिरवा कंदील
प्रतिनिधी / बेंगळूर
लॉकडाऊनमुळे राज्यातील जनता आर्थिक संकटात असतानाच आता वीजदरवाढीचा शॉक बसला आहे. कर्नाटक वीज दर नियंत्रण आयोगाने (केईआरसी) राज्यातील सर्व वीज वितरण कंपन्यांना वीजदरवाढीला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यानुसार प्रतियुनिट 3.84 टक्के म्हणजेच सरासरी 30 पैसे दरवाढ झाली आहे. 1 एप्रिल 2021 पासूनच दरवाढ जारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लॉकडाऊन जारी असल्याने मागील दोन महिन्यांत वाढीव दर आकारणी झाली नव्हती. त्यामुळे मागील वाढीव बिलाची बाकी कोणतेही व्याज न आकारता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात दोन समान रकमेत वसूल करण्याची मुभा ‘केईआरसी’ने दिली आहे.
बेंगळूर वीज पुरवठा निगमसह राज्यातील पाचही वीज पुरवठा कंपन्यांनी काही महिन्यांपूर्वीच प्रतियुनिट 83 पैसे ते 1.68 पैसे दरवाढीचा प्रस्ताव ‘केईआरसी’कडे पाठविला होता. मात्र, मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीज दरवाढीबाबत चर्चा करून प्रतियुनिट 30 पैसे वाढ करण्यास संमती दर्शविल्याचे समजते. वाढीव वीजदर 1 एप्रिलपासून किंवा त्यानंतर होणाऱया पहिल्या मीटर रिंडींगपासून लागू होणार आहे.
वीजदरवाढीची घोषणा विलंबाने केल्याविषयी स्पष्टीकरण देताना ‘केईआरसी’ने राज्यातील विधानसभा व लोकसभेची पोटनिवडणूक, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता जारी असल्याने वीजदरवाढीची घोषणा करण्यात आली नाही. त्यानंतर कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आल्याने ‘केईआरसी’च्या दैनंदिन कामकाजात व्यत्यय निर्माण झाला होता, असे सांगितले आहे.
हेस्कॉमने प्रतियुनिट 83 पैसे वीजदरवाढ करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. तर जीस्कॉमने सर्वाधिक 1.68 पैसे दरवाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. सर्व प्रस्तावांचा विचार करून 3.84 टक्के दरवाढीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार वीजदरात सरासरी 30 पैशांनी वाढ होणार आहे. त्याचबरोबर उच्चदाबाच्या विजेचा (एचटी) वापर करणाऱया उद्योगांसाठी सकाळी 6 ते 10 या कालावधीत वापरल्या जाणाऱया प्रतियुनिट विजेसाठी आकारण्यात येणारा 1 रुपये दंड रद्द करण्यात आला आहे. तर घरगुती वापरासाठीच्या विजेचा पहिला स्लॅबचा टप्पा 30 युनिटवरून 50 युनिट करण्यात आला आहे.









