पदवीपूर्व शिक्षण खात्याकडून आदेश जारी
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात 2021-22 या शैक्षणिक वर्षातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया दहावी परीक्षेचा निकाल आणि पदवीपूर्व शिक्षण खात्याकडून मार्गसूची आल्यानंतरच सुरू करावी, असा आदेश देण्यात आला आहे. पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या संचालकांनी बुधवारी यासंबंधीचा आदेश दिला आहे.
दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक अद्याप घोषित करण्यात आलेले नाही. दरम्यान, काही पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्याच्या तक्रारी पदवीपूर्व शिक्षण खात्याकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर खात्याच्या संचालकांनी आदेशपत्रक जारी करून दहावी निकालापूर्वी आणि खात्याकडून मार्गसूची जारी होण्याआधी अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू करू नये. ऑनलाईन वर्ग देखील सुरू करू नयेत, असा आदेश दिला आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱया महाविद्यालयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तसेच या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचाही विचार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.









