शिरोमणी अकाली दलाची बसपशी आघाडी – भाजपची जागा घेणार
वृत्तसंस्था/ अमृतसर
भाजपशी आघाडी तुटल्यावर शिरोमणी अकाली दल आता बसपसोबत मिळून 2022 ची विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. 2 महिन्यांच्या अनेक मॅराथॉन बैठकांनंतर आघाडीला अंतिम स्वरुप देण्यात आले आहे. पण अद्याप औपचारिक घोषणा झालेली नाही. दोन्ही पक्षांमध्ये अद्याप जागावाटपावरून अंतिम निर्णय झाला नसल्याचे मानले जात आहे.
अकाली दल भाजप्रमाणेच बसपला मर्यादित जागा देऊ पाहत आहे. तर बसप अधिक जागांची मागणी करत आहे. बसप 30 टक्के म्हणजेच 37 ते 40 जागांची मागणी करत आहे. पण अकाली दलाने केवळ 18 जागा देण्याची तयारी दर्शविली आहे.
33 टक्के दलित मतदार
राज्यात दलितांकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप विविध राजकीय पक्षांचे नेते करत असतात. अलिकडेच काँग्रेसमधील अंतर्गत कलहादरम्यानही पक्षश्रेष्ठींच्या समितीसमोर विविध नेत्यांनी हाच मुद्दा उपस्थित केला होता. राज्यात दलितांच्या मुद्दय़ांना व्यासपीठच मिळत नाही. दलित आमदाराचे कोणी ऐकत नसल्यास सर्वसामान्य जनतेचे काय होईल, याकरता सरकारने ठोस पावले उचलावीत असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले होते. पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक पाहता सर्वच राजकीय पक्षांची 33 टक्के दलित मतपेढीवर विशेष नजर आहे. याचमुळे सर्व पक्ष दलित नेत्यांना स्वतःसोबत घेऊ पाहत आहेत.
उपमुख्यमंत्रिपद दलित नेत्याला
शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी दलित नेत्याला उपमुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे. राज्यात बसपमधील बहुतांश नेते दलित असल्याने या आघाडीचा लाभ अकाली दलाला मिळणार आहे. पक्ष आणि दलित नेत्यांची राज्यातील स्थिती जाणून घेण्यासाठी अकाली दल सर्व 117 विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण करवत आहे. यात कुठल्या मतदारसंघात दलित नेत्यांचे किती समर्थक आहेत आणि त्यांना किती मते मिळू शकतात हे यात पाहिले जाणर आहे.
दलित मुख्यमंत्र्याची भाजपची घोषणा
दुसरीकडे अकाली दल आणि बसपची तयारी पाहता आणि दलितांचे समर्थन मिळविण्यासाठी भाजपने दलित नेत्याला मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे. दलितांकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपांना पूर्णविराम मिळावा यादृष्टीने भाजपने हा निर्णय घेतला आहे. अकाली दलाने बसपला सोबत घेत दलितांना आकर्षित करण्याप्रकरणी बाजी मारली आहे.









