काश्मीर खोऱयात चर्चेला ऊत
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. निवडणूक सेवेवर तैनात निमलष्करी दलाचे 6 हजार परतल्यापासून काश्मीरमध्ये अफवांना ऊत आला आहे. लोकांदरम्यान केंद्रशासित प्रदेशाच्या पुनर्विभाजनापासून जिल्हय़ांच्या पुनर्रचनेवरूनवरून चर्चा होत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच निवडणूक घेतली जाऊ शकते असाही अनुमान व्यक्त होत आहे.
काश्मीरमध्ये 6 हजार जवान परतल्याने नेत्यांच्या मनातही अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत. पीपल्स काँग्रेसचे प्रमुख सज्जाद लोण यांनी याप्रकरणी ट्विट करत निमलष्करी दलाच्या 60 तुकडय़ा परतल्यापासून अफवांना उधाण आल्याचे म्हटले आहे.
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या काळात सुरक्षेसाठी या जवानांना तैनात करण्यात आले होते. हे जवान 5 ऑगस्ट 2019 पासून काश्मीरमध्ये तैनात होते. तेव्हा जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेत त्याला दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागण्यात आले होते.
जम्मू-काश्मीरमध्ये कुठल्याही प्रकारे अतिरिक्त सुरक्षा दलांना तैनात करण्यात आलेले नाही अशी माहिती जम्मू क्षेत्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग यांनी दिली आहे. याचदरम्यान सोशल मीडियावर जम्मू-काश्मीरच्या पुनर्विभाजनावरून अनेक कयास वर्तविण्यात येत आहेत. जम्मूला राज्याचा दर्जा मिळणार तर काश्मीर केंद्रशासित प्रदेश राहणार असल्याचेही सोशल मीडियावर म्हटले जात आहे.