प्रतिनिधी / दापोली
बंगालच्या उपसागरात 11 जून रोजी नव्याने निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या (Low pressure belt) पट्ट्यामुळे कोकणामध्ये 14 जून रोजी अतिवृष्टी होणार असल्याची माहिती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिली आहे.
बंगालच्या उपसागरात 11 जून रोजी उत्तर बंगाल उपसागरा जवळ हा कमीदाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. यामुळे बंगालच्या उपसागरात जोरदार अतिवृष्टी होणार आहे. शिवाय या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात पाऊस घेऊन येणारे नैऋत्य मोसमी वारे हे वेगाने जमिनीकडे वेगाने खेचले जाणार आहेत. यामुळे कोकणामध्ये 14 जून रोजी जोरदार अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
ही अतिवृष्टी 200 मिमी पर्यंत पोहोचू शकते. यावेळी वाऱ्याचा वेग 25 किमी प्रतितास पर्यंत पोहोचू शकतो. शिवाय हा कमी दाबाचा पट्टा 11 जून नंतर समुद्रातून जमिनीकडे देखील सरकणार आहे. याचा कोकणातील पर्जन्यमानावर थेट परिणाम होणार असल्याची माहिती देखील विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिली.