आवाज उठविल्यास कंत्राटदाराकडून कामावरुन कमी करण्याची धमकी, लवकरच आंदोलन छेडणार
प्रतिनिधी / बेळगाव
शहराची व उपनरांची स्वच्छता करण्यासाठी सफाई कंत्राटदारांची महापालिकेने नेमणूक केली आहे. मात्र कंत्राटदार कर्मचाऱयांना घेताना वेगवेगळय़ा अटी व नियम लागू करत आहेत. त्या कर्मचाऱयांना सराकरी नियमांनुसार वेतन आणि सर्व सुविधा देणे गरजेचे आहे. मात्र कंत्राटदार आणि मुकादम कर्मचाऱयांशी मनमानीपध्दतीने वागत कर्मचाऱयांना वेठीस धरण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या विरोधात लवकरच आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अनगोळ वॉर्ड क्रमांक 5 आणि 6 मधील कामगारांच्या या तक्रारी आहेत. दोन्ही वॉर्डातील कचरा उचल करण्यासाठी नियमानुसार 30 हून अधिक कर्मचाऱयांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. मात्र कंत्राटदारांकडून दोन्ही वॉर्डातील कचरा केवळ 15 ते 16 कर्मचाऱयांच्या माध्यमातूनच करण्यात येत आहे. यामध्ये महिलांची संख्या अधिक आहे. गटारीतून काढलेला कचरा उचलणे आणि कचरा भरुन वाहनांमध्ये टाकण्याचे काम पुरूष कर्मचाऱयांकडून केले जाते तर महिला गटारीतील कचरा काढुन झाडू मारणे, गवत काढणे अशी कामे करत असतात.
पण गेल्या काही दिवसांपासून वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे कामही महिलांनाच लावण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पुरूष कर्मचारी नसल्यामुळे आता महिला संतप्त झाल्या आहेत. महिलांना गटारीतील कचरा बाजुला काढुन टाकणे, गवत काढणे लावणे बंधनकारक आहे. पण कंत्राटदार महिलांकडूनच कचरा उचलची कामे करुन घेत आहेत.
कचरा उचल करण्यासाठी वाहनांची कमतरता आहे. घरोघरी जाऊन घंटागाडीच्या माध्यमातून कचरा जमा केला जातो. ही योजना काही वर्षे चालली. मात्र आता काही दिवसांपासून बंद पडण्याच्या मार्गावरच वाटचाल करत आहे. कारण घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे कामही महिला कर्मचारी करत आहेत. घंटागाडी बंद झाल्यामुळे कचरा रस्त्यावर पडत आहे. एकूणच मोठी समस्या निर्माण झाली असून सफाई कर्मचारी कंटाळले आहेत.
कंत्राटदाराकडून धमकी
कोरोना काळात आणि पावसाळय़ात सफाई कर्मचारी आपला जीव धोक्मयात घालून हे काम करत असतात. नियमाप्रमाणे वेतन आणि इतर सुविधा दिल्या पाहिजेत. मात्र कंत्राटदाराकडून वेतन कमी दिले जात आहे. पूर्ण वेतन मिळत नाही. पूर्ण हजेरी भरुनही पगार देत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत कंत्राटदाराला विचारले असता कामावरुन कमी करु, अशी धमकी दिली जात आहे.
लवकरच आंदोलन
माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी या कर्मचाऱयांच्या समस्या ऐकून घेवून कंत्राटदाराने त्यांच्या समस्या सोडविल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा दिला आहे. कोणत्याही कर्मचाऱयांना काढुन टाकण्याची धमकी दिली किंवा वेतन दिले तर आता त्या विरोधात आंदोलन करुन कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.









