उमेश मजुकर / बेळगाव

नव्वदीच्या दशकात मैदानाच्या झालेल्या बदलामुळे गती व लवचिकता वाढीस लागल्याने खोखोपटूंत वेगळीच उर्जा निर्माण झाली.नव्वदीच्या दशकानंतर खो-खोमधील विविधता व मैदानाची नवीन आखणी झाल्यानंतर खेळामध्ये वेग व चपळाई वाढली. 7 ऐवजी 9 मिनिटाच्या खेळाला सुरूवात झाली. 9 मिनिटाच्या खेळात रनर्स केवळ 2 किंवा 3 गडी बाद करीत असत. पण 9 मिनिटाच्या खेळाला प्रारंभ झाल्यानंतर ऑलआऊट किंवा 7 ते 8 गडी बाद होऊ लागले. या काळात चेजिंगचे तंत्र बदलले व चपळाईने गडी टिपण्यास मदत झाली. त्यातूनही बेळगावच्या अनेक खोखोपटूंनी सुधारित नियमांनुसार सराव करून यश मिळविले.
येळ्ळूरच्या अनेक खोखोपटूंनी ज्युनियर गटात राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमक दाखविली. बेळगाव शहराच्या केशव चव्हाण, परशराम जाधव, शिवाजी पाटील, सदानंद आनंदाचे, प्रकाश पाटील, मारूती पाटील, गजानन निंबाळकर, इंद्रजीत पाटील, अनिल हेब्बाळकर, संजय जुवेकर, प्रकाश पुजारी, प्रदीप चौगुले व आप्पा आनंदाचे या खेळाडूंनी आपली वेगळीच छाप सोडली होती. शहराबरोबर ग्रामीण भागतही खोखोने पाय रोवले होते. येळ्ळूर व इतर ग्रामीण भागातील खेळाडूंनी चमक दाखवत यश संपादन केले होते. प्रदीप मेणसे, चांगाप्पा कार्लेकर, जोतिबा बेर्डे, गजानन उगाडे, महेश जाधव, अतुल मुचंडी, अर्जुन कुंडेकर, दिनेश घाडी, प्रशांत कुगजी, रमेश घाडी, नरेश हट्टीकर, यशवंत जाधव, रमेश हट्टीकर, संदीप कुगजी, विनायक धामणेकर, मारूती कुट्रे, पांडुरंग निलजकर, बाळकृष्ण धामणेकर, केदारी पाटील, राजू धुलजी, ओमकार पाटील, प्रसाद कानशिडे, प्रवीण बिर्जेकर, सत्यजित पाटील, चेतन हुंदरे, प्रकाश गोरल, एकनाथ धामणेकर, श्रीधर सरदेसाई, प्रतिक मेलगे, श्रीधर मांदुळकर, शुभम टीक्केकर, सुरज पाटील, सागर घाडी, महेश पाटील, राजु पाटील, नितीन गोरल, संदीप कुंडेकर, बबन कुगजी, राघवेंद्र सुतार, सुनिल पाटील, किशोर मालुचे, शंकर मेलगे, प्रशांत मेलगे, सुशांत धामणेकर, कपिल धामणेकर, कृष्णा बिर्जेकर, सिद्धांत पाटील, गौरेश पाटील, प्रफुल पाटील, कातकर, यश कातकर, साईनाथ पाटील, शंकर घाडी, चंदन देसाई, सोमनाथ पाटील, यश पाटील, साहिल पाटील, प्रज्वल पाटील, ओमकार हलगेकर, सुरज सांबरेकर, रोहन धामणेकर, चिन्मय पाटील, धीरज घाडी, क्षमेश गोरल आदी खेळाडूंनी या काळात नेत्रदीपक यश मिळविले होते.
या काळात प्रशिक्षकांप्रमाणे खेळही थोडाफार बदलला, त्यामुळे तंत्रही बदलले. पोल मारणे, प्रथम पाटीतून पोल मारणे, द्वितीय पाटीतून पोल मारणे, रेषा कव्हर करून खेळाडू 40 टक्के धावणे, अटॅक करणे आदींसह खेळाडूंचा फिटनेस वाढवण्याचा प्रयत्न प्रशिक्षकांनी केला. त्याचा फायदा या खेळाडूंना झाला. त्याप्रमाणे खेळाची गतीही वाढली. पूर्वी 34 *16 हे खोखोचे मैदान पुरूष व महिलांसाठी होते. त्यानंतर ते बदलून 29*16 असे करण्यात आले. आणि आता 27*16 अशा मैदानाची आखणी करण्यात आली आहे.
बदलत्या खोखोमुळे खेळाडूंचा कस वाढविण्यासाठी प्रशिक्षक अनेक प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. बेळगावच्या खोखोपटूंनी खेळाचा दर्जा वाढविला असून, नवीन तंत्रानुसार सराव करीत आहेत. भावी काळात खोखोची परंपरा अशीच चालू राहील, अशी अपेक्षा प्रशिक्षक करत आहेत.
जे. एस. मंतेरो (ज्येष्ट खेळाडू व प्रशिक्षक)

पूर्वीचे खोखो आणि आताचे खोखो यात खूप फरक आहे. त्या बेळगावात खोखो जोमात होता. चौकाचौकात फलक लिहिलेले असायचे. त्यावरून प्रेक्षकांची गर्दी सामने पाहण्यास होत होती. चिकाटीने खेळल्याने त्याचा फायदा भावी जीवनात झाला. खोखोमुळे शिक्षकाची नोकरी मिळाली. क्रीडाशिक्षक नसलो तरी त्या शाळेतील विद्यार्थ्यांना खोखोचे प्रशिक्षण दिले. खोखोमुळे शटल बॅडमिंटन खेळण्यास फार मदत झाली. कोणताही खेळ खेळण्यापूर्वी खोखोचा सराव करावा.
सुरेश भातकांडे (ज्येष्ट खोखोपटू व विज्ञान विषयाचे शिक्षक)

पूर्वीच्या काळात भगतसिंग व साधना या दोन क्लबचे खेळाडू अतिशय दर्जेदार खेळ करीत असत. त्या दर्जेदार खेळामुळे अनेक चांगले खेळाडू निर्माण झाले. प्रशिक्षक सुजयकुमार, राजु कुरणे, एम. एस. पाटील, रवी राजाई यांच्यासारख्या दिग्गज प्रशिक्षकांकडून मिळालेले मार्गदर्शन माझ्या खोखोच्या जीवनात मोलाचे ठरले. खोखो हा बुद्धिवंताचा खेळ असून त्यात शारिरीक क्षमतेबरोबर बुद्धीचीही कसोटी लागते.
वाय. सी. गोरल (ज्येष्ट खोखो प्रशिक्षक)

शालेय जीवनापासून खोखोचे धडे गिरविले. 1980 साली कोईमतूर, तामिळनाडू येथे ग्रामीण राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पटकाविले. तुमकूर राष्ट्रीय खोखो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंदोर व यंगस्टर तुमकुर यांच्यातील सामन्यात तांत्रिक व वैद्यकीय विद्यार्थी खेळत असताना त्यांची प्रेरणा घेऊन गेली 38 वर्षे येळ्ळूरच्या महाराष्ट्र हायस्कूलमध्ये खोखोचे प्रशिक्षण देत आहोत. 75 हून अधिक राष्ट्रीय खोखोपटू घडविले आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल संघाने 18 वेळा उपविजेतेपद पटकाविले आहे.
एन. आर. पाटील (जिल्हा खोखो अमॅच्युअर संघटनेचे सचिव)

त्या काळात खोखोपटूंना चांगले दिवस होते. अनेक खोखोपटू क्रीडाशिक्षक, विषयशिक्षक म्हणून रूजू झाले आहेत. आज खोखोचा दर्जा उंचावला आहे. पण संगणक व मोबाईलमुळे खोखोपटूंचे सरावाकडे दुर्लक्ष होत आहे. याउलट ग्रामीण भागातील खेळाडू जोमाने सराव करून आपले ध्येय गाठत आहेत. त्यासाठी शहरी भागातील खेळाडूंनी दुर्लक्ष न करता नियमितपणे सराव करावा. तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो.









