प्रतिनिधी/ लांजा
तालुक्यातील कणगवली पेणेवाडीतील सीताराम सुवारे यांच्या खुनाचा छडा लावण्यात अखेर लांजा पोलिसांना यश आले आहे. आर्थिक देवाणघेवाण व्यवाहारातून हा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून लांजा पोलिसांनी अवघ्या 10 तासांच्या आत तालुक्यातील वेरळ पवारवाडी येथील वैभव कृष्णा पवार (34) व गावडेवाडी येथील अजित गणपत गावडे (28) या दोघांना दोघांना अटक केली आहे. त्या दोघांनी खुनाची कबुली दिल्याची माहिती लांजा पोलिसांनी पत्रकारांना दिली आहे.
या दोन्ही संशयितत आरोपींना सोमवारी दुपारी लांजा येथील दिवाणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 10 जूनपर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तालुक्यातील कणगवली पेणेवाडी येथील सीताराम सोमा सुवारे (56) यांचा व्याजी पैसे देण्याचा व्यवसाय होता. 2 जून रोजी सकाळी 7 च्या सुमारास ते तालुक्यातील भांबेड येथे जात असल्याचे पत्नीला सांगून गेले होते. आपली मोटार सायकल (एम.एच. 08. एस 7162) ने ते भांबेड येथे गेले होते. दिवस संपून सायंकाळ झाली तरी ते घरी न परतल्याने घरच्या मंडळींनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. मात्र ते कोठेच सापडून आले नाहीत. त्यामुळे 4 जून रोजी त्यांचा मुलगा स्वप्नील सुवारे याने लांजा पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची रितसर फिर्याद दाखल केली होती. मात्र त्यानंतरही सीताराम सुवारे यांच्या घरची मंडळी त्यांचा शोध घेतच होती.
याच दरम्यान कणगवली येथे काही लोकांनी सीताराम सुवारे यांचा शोध घेणाऱया त्यांच्या नातेवाईकांना कणगवली – वेरळ रस्त्यालगत एका झाडीच्या आडोशाला एक मोटारसायकल असल्याचे सांगितले. ही मोटारसायकल तुमचीच आहे का ते पहा असेही त्या लोकांनी सुवारे यांच्या नातेवाईकांना सांगितले. सुवारे यांच्या नातेवाईकांनी याठिकाणी शोध घेतला असता ती मोटारसायकल सीताराम सुवारे यांचीच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नातेवाईकांनी परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली असता मुख्य रस्त्यापासून साधारणतः 200 मीटर अंतरावर असलेल्या एकनाथ जाधव यांच्या बागेच्या दगडी गडग्याजवळ सीताराम सुवारे यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत संशयास्पदरित्या आढळून आला. त्यानंतर नातेवाईकांनी याबाबतची लांजा पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील व पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव हे सहकाऱयांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला बेपत्ता व त्यानंतर आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली होती. मात्र सीताराम सुवारे यांच्या मृतदेहावर आढळून आलेल्या संशयास्पद जखमा पाहून पोलिसांनी हा अपघात नसून घातपात असल्याचे ओळखले. सीताराम सुवारे यांच्या उजव्या कानापासून भुवईपर्यंत 5 इंच एवढी खोल जखम होती असल्याने शवविच्छेदन अहवालात देखील सुवारे यांची हत्या करण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात मारेकऱयायांविरुद्ध भादवि कलम 302, 397, 201, 34 अन्वये गुन्हा दाखल करून अधिक गतीने तपासाची चक्रे फिरवताना तालुक्यातील वेरळ पवारवाडी येथील वैभव कृष्णा पवार व गावडेवाडी येथील अजित गणपत गावडे या दोघांना त्याच रात्री उशिरा संशयित म्हणून ताब्यात घेतले. पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केली असता दोघांनाही आपण केलेल्या कृत्याची कबुली पोलिसांकडे दिली.
मोबाई&लवरील कॉलरेकॉडवरुन सापडला धागा
2 जून रोजी वैभव पवार याने सातत्याने सीताराम सुवारे व अजित गावडे यांच्या मोबाईलवर कॉल केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. हाच धागा पकडून पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवली आणि अवघ्या 10 तासांच्या आत आरोपींना गजाआड केले. सीताराम सुवारे यांच्याकडून वैभव पवार याने व्याजी घेतलेले पैसे परत द्यायला लागू नयेत म्हणून त्यांचा काटा काढण्यात आल्याची कबुली दोन्ही आरोपींनी पोलिसांना दिली आहे. यावेळी आरोपींनी मयत सीताराम सुवारे यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची 60 हजार रुपयांची सोन्याची चेन व त्यांच्याकडील रोख रक्कम 35 हजार रुपये घेवून पोबारा केला अशी कबुली देखील आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
या खून प्रकरणाचा तपास लांजाचे उपविभागीय पोलिस अधिकारी निवास साळोखे व रत्नागिरी येथील पोलीस उप अधीक्षक सखाराम वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजाचे प्रभारी पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर व उप निरीक्षक श्वेता पाटील यांनी केला. लांजा पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.








