वृत्तसंस्था/ पॅरीस
2021 च्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेपूर्वी आयोजित केलेल्या मित्रत्वाच्या सराव सामन्यामध्ये बेल्जियम आणि हॉलंड यांनी रविवारच्या लढतीत अनुक्रमे क्रोएशिया आणि जार्जिया यांचा पराभव केला.
रविवारच्या शेवटच्या सरावाच्या सामन्यात बेल्जियमने क्रोएशियाचा 1-0 असा पराभव केला. फिफाच्या ताज्या मानांकनात पहिल्या स्थानावर असलेल्या बेल्जियमने रविवारच्या सामन्यात 2018 साली विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेतील उपविजेत्या केएशियावर मात केली. या सामन्यातील एकमेव गोल बेल्जियमच्या लुकाकुने हेडरद्वारे 37 व्या मिनिटाला नोंदवला. 28 वर्षीय लुकाकुचा हा आंतरराष्ट्रीय सामन्यातील 60 वा गोल आहे. युरो चषक फुटबॉल स्पर्धेत बेल्जियमचा ब गटात समावेश असून डेन्मार्क, फिनलँड आणि रशिया यांचाही या गटात समावेश आहे.
रविवारच्या दुसऱया एका सरावाच्या सामन्यात हॉलंडने जॉर्जियाचा 3-0 अशा गोल फरकाने एकतर्फी पराभव केला. या सामन्यात दहाव्या मिनिटाला हॉलंडचे खाते मेमफिस डिपेने पेनल्टीवर उघडले. बेल्जियमचा दुसरा गोल वेगहॉर्सने तसेच तिसरा गोल रेयान ग्रॅव्हेनबर्चने केला. युरो चषक फुटबॉल स्पर्धेत बेल्जियमचा क गटात समावेश असून या गटात युक्रेन, ऑस्ट्रीया आणि नॉर्थ मॅसेडोनिया यांचा समावेश आहे.









