अयोध्येतील मशिदीसंबंधी ट्रस्टचा निर्णय
वृत्तसंस्था/ अयोध्या
अयोध्येतील धन्नीपुर गावातील प्रस्तावित मशीद आणि रुग्णालय परिसराला देण्यात येणारे नाव अखेर ठरले आहे. मशिदीला क्रांतिकारक मौलवी अहमदुल्ला शाह फैजाबादी यांचे नाव देण्यात येणार आहे. त्यांचा मृत्यू 164 वर्षांपूर्वी झाला होता.
1857 च्या बंडानंतर दोन वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत अवधला ब्रिटिशांच्या प्रभुत्वापासुन मुक्त ठेवण्यासाठी फैजाबादी यांनी कार्य केले होते. याचमुळे मशीद, रुग्णालय, संग्रहालय, संशोधन केंद्र आणि अन्नछत्रासह पूर्ण प्रकल्प त्यांना समर्पित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती इंडो-इस्लामिक कल्चरल फौंडेशनने दिली आहे.
फैजाबादी यांच्या हुतात्मा दिनी पूर्ण प्रकल्पाला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेताल आहे. स्वातंत्र्याच्या पहिल्या लढाईच्या 160 वर्षांनंतरही फैजाबादी यांना भारतीय इतिहासात अद्याप योग्य स्थान मिळालेले नसल्याचे फौंडेशनचे सचिव अतहर हुसेन यांनी म्हटले आहे. एका ब्रिटिश हस्तकाने त्यांना मारले होते. मारल्यावर त्यांचे शीर आणि धड वेगवेगळय़ा जागी दफन करण्यात आले होते अशी माहितीही हुसैन यांनी दिली आहे.
नोव्हेंबर 2019 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मिळालेल्या 5 एकर जमिनीवर मशीद आणि रुग्णालय प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सुन्नी वक्फ बोर्डाकडून स्थापन आयआयसीएफ ट्रस्टने मुघल बादशाह बाबरचे नाव मशिदीला न देण्याचा निर्णय घेतला होता.









