नवी दिल्ली / वृत्तसंस्था
टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र भारतीय मल्ल सुमित मलिक उत्तेजक चाचणीत दोषी आढळला असून यामुळे त्याला अंशतः निलंबित केले गेले आहे. टोकियो ऑलिम्पिकला अवघे काही आठवडे बाकी असताना यामुळे भारतावर नामुष्की आली आहे. अलीकडेच बल्गेरियात संपन्न झालेल्या पात्रता स्पर्धेदरम्यान सुमितची चाचणी घेतली गेली होती. भारताने टोकियो ऑलिम्पिक कुस्तीत 8 जागांवर तिकीट निश्चित केले असून त्यात 4 पुरुष व 4 महिला मल्लांचा समावेश आहे.
प्रत्यक्ष ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी एखादा भारतीय मल्ल उत्तेजक चाचणीत दोषी आढळून येण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2016 रिओ ऑलिम्पिकपूर्वी नरसिंग यादव उत्तेजक चाचणीत दोषी आढळून आला व यामुळे त्याच्यावर 4 वर्षांची बंदी लादली गेली होती.
2018 राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता सुमित मलिकने सोफिया, बल्गेरिया येथील विश्व ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या माध्यमातून 125 किलोग्रॅम वजनगटातून टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले होते. बल्गेरियातील पात्रता स्पर्धा ही ऑलिम्पिक सहभागासाठी मल्लांना शेवटची संधी होती. मात्र, आता उत्तेजक चाचणीत दोषी आढळून आल्याने 28 वर्षीय सुमित मलिकसाठी ऑलिम्पिकमधील सहभाग धोक्यात आला आहे.
‘युनायटेड वर्ल्ड रेसलिंगकडून (यूडब्ल्यूडब्ल्यू) आम्हाला आज ईमेल आला असून त्यात त्यांनी सुमित मलिक उत्तेजक चाचणीत दोषी आढळून आल्याने त्याला निलंबित करत असल्याचे नमूद केले आहे’, असे भारतीय कुस्ती फेडरेशनचे सचिव विनोद तोमर यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. ‘सुमित दोषी आढळला, हे आमच्यासाठी देखील आश्चर्याचे आहे. त्याचा ट्रक रेकॉर्ड अतिशय उत्तम आहे. अजाणतेपणाने त्याने काही तरी घेतले असावे. आम्ही त्याच्या बी सॅम्पलची प्रतीक्षा करु’, याचा तोमर यांनी उल्लेख केला.
दिल्लीस्थित क्रीडा क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व ऍड. पार्थ गोस्वामी यांनी सुमित मलिक प्रथमच दोषी आढळून आला असल्याने त्याला अंशतः देखील निलंबित करता येत नाही, असा दावा यावेळी केला. ‘वाडा 2021 तरतुदीनुसार, नॉन-स्पेसिफाईड सबस्टन्स पॉझिटिव्ह असल्यास अशा ऍथलिटला केवळ प्राथमिक निलंबित केले जाते व या परिस्थितीत तो स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाही. अंतिम निर्णय घेतला गेल्यानंतरच पूर्ण चित्र स्पष्ट होते. दुसरीकडे, स्पेसिफाईड सबस्टन्सचा मुद्दा असेल तर संबंधित ऍथलिटला प्राथमिक निलंबन स्वीकारण्याचा पर्याय दिला जातो. तो स्वीकारल्यास त्याला स्पर्धेत सहभागी होता येते’, असे ऍड. गोस्वामी पुढे म्हणाले.