नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश निश्चित केलेला भारतीय कुस्तीपटू सुमित मलिक डोप टेस्टमध्ये फेल झाला आहे. त्याच्यावर बंदी घातलेला पदार्थाचे सेवन केल्याचा आरोप आहे. अँटी डोपिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने या कुस्तीपटूला सध्या निलंबित केले आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने (डब्ल्यूएफआय) याची पुष्टी केली आहे.
ऑलिम्पिक सुरू होण्याच्या काही दिवस आधी डोपिंग प्रकरणी खेळाडूला निलंबित करण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिकच्या आधी कुस्तीपटू नरसिंह यादव हा देखील डोप चाचणीत सापडला होता. तेव्हा त्याच्यावर चार वर्षाची बंदी घालण्यात आली होती.
सुमित मलिकने २०१८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. बुल्गारिया स्पर्धेत १२५ किलो गटात विजेतेपद मिळवून सुमितने टोकिओ ऑलिम्पिकचे तिकिट मिळवले होते. ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्याची ही अखेरची संधी होती. पण आता डोपिंग चाचणीत सापडल्याने २८ वर्षाच्या या कुस्तीपटूचे ऑलिंपिक स्वप्न जवळजवळ भंगले आहे.