बेळगाव/प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आज बेळगाव दौऱ्यावर आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पर्शवभूमीवर सुवर्ण सौध समोर हलगा मच्छे बायपास रद्द करा यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
हलगा मच्छे बायपास रस्त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्याप्रमाणात शेतजमीन जात आहेत. या बायपास रोडमुळे शेतकरी भूमिहीन होणार आहेत. अनेक शेतकऱ्यांचं पोट या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून शेतकरी हलगा मच्छे बायपास रद्द करण्याची मागणी करत आहेत. परंतु लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत. आज मुख्यमंत्री बेळगाव दौऱ्यावर आले असता शेतकऱ्यांनी आंदोलन करत हलगा मच्छे बायपास रद्द करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना तब्यत घेतले.
दरम्यान शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर हलगा मच्छे बायपास रद्द करा, शेतकऱ्यांना भात, सोयाबीन यासारख्या पिकांना वाढीव भाव द्यावा, भाजी पाल्याला मिळणारा कवडीमोल भाव, शासनाच्या बियाणांचे असणारे जास्त भाव, रासायनिक खतांचा तुटवडा, ऊसाची थकीत बिले यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सुवर्ण सौध समोर आंदोलन केले.
रयत संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
दरम्यान यावेळी बेळगाव जिल्ह्यातील रयत संघटनांनी या धरणे आंदोलनात भाग घेतला. मुख्यमंत्री बेळगाव विमानतळावर दाखल होताच शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आशयाचे निवेदन देऊन त्या मागण्या मान्य करण्याची विनंती केली.